दीनदयाळ नागरी सहकारी बँकेस 31 मार्च 2022 अखेर 4 कोटी 32 लाखांचा नफा

अंबाजोगाई : आर्थिक क्षेत्रात आश्वासक व दमदार पाऊले टाकणाऱ्या दीनदयाळ बँकेला 31 मार्च 2022 अखेर 4 कोटी 32 लाख रूपयांहून अधिकचा करपूर्व नफा झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. मकरंद पत्की व उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेश्वर देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

‘विश्वास, विकास आणि विनम्रता’ या त्रिसुत्रीनुसार मराठवाड्याच्या सहकार क्षेत्रात मागील काही वर्षांत नावारूपास आलेली व वेगाने प्रगतीकडे वाटचाल करणारी दीनदयाळ नागरी सहकारी बँक सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदु मानून समाजाच्या सर्वच क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या संपन्नता आणण्यासाठी कटीबध्द आहे.

दीनदयाळ बँकेची 31 मार्च 2022 अखेर सांख्यिकीय माहिती 

वसूल भागभांडवल – 13.28 कोटी, राखीव व इतर निधी –  27.30 कोटी, संकलित ठेवी – 425.46 कोटी, केलेली गुंतवणुक – 174.95 कोटी, वितरीत कर्जे – 256.24 कोटी केले असून निव्वळ अनुत्पादक कर्जे (नेट एनपीए) चे प्रमाण 6.98 टक्के एवढे आहे. बँकेने एकूण 681.70 एवढा व्यवसाय केला आहे. बँकेकडे 480.60 एवढे खेळते भांडवल आहे तर बँकेस 4 कोटी 32 लाख इतका करपूर्व नफा झाला आहे.

बँकेस संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे कार्यक्षेत्र आहे. तसेच बँकेच्या संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 17 एवढ्या शाखा कार्यरत असून अंबाजोगाई येथे बँकेचे मुख्यकार्यालय स्वत:च्या मालकीच्या भव्य इमारतीमध्ये कार्यरत आहे. बँकेच्या वतीने प्रतिवर्षी युगपुरूष स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. मागील 20 वर्षांपासून राज्यातील व राज्याबाहेरील अनेक नामवंतांनी आपल्या अमोघ वाणीने अंबाजोगाईकरांना, ज्ञान, अध्यात्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक मेजवानी दिलेली आहे.

वृक्षारोपण तसेच पाणी टंचाईच्या काळात बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून बंधारा बांधला. मुक्या जनावरांसाठी बँकेच्या वतीने पाणपोईची सुविधा करण्यात आलेली होती. कोविडच्या काळात सर्व ग्राहकांना दर्जेदार व तत्पर सेवा दिल्याबद्दल ग्राहकांच्या वतीने बँकेस वेळोवेळी लेखी प्रशंसा व गौरवपत्र प्राप्त झालेले आहेत.