अंबाजोगाईत झाला किसानपुत्रांचा मेळावा
शेतकरी सहवेदना पदयात्रेचा शानदार समारोप : ठिकठिकाणी पदयात्रेचे जंगी स्वागत
अंबाजोगाई : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी असलेले जाचक कायदे रद्द करावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यासोबतच पानगाव येथे शहीद रमेश मुगे यांचे स्मारक येत्या वर्षभरात उभारण्यात येईल असे सांगत किसानपुत्र आंदोलन आपली व्याप्ती ठिकठिकाणी वाढविणार असल्याचे किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी सांगितले.
19 मार्च, अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पानगाव ते अंबाजोगाई अशी सलग तीन दिवस निघालेल्या शेतकरी सहवेदना पदयात्रेच्या समारोपानिमित्त अंबाजोगाईत आद्यकवी मुकुंदराज सभागृहात किसानपुत्रांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर प्रा. डॉ. शैलजा बरूरे किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव बसरगेकर, स्थानिक संयोजक सुदर्शन रापतवार, मयुर बागुल, दिपक नारे, सुभाष कच्छवे, रामकिसन रूद्राक्ष, नितीन राठोड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. शैलजा बरूरे म्हणाल्या की, शेतकर्यांच्या आत्महत्या केवळ निसर्गनिर्मित कारणानेच नव्हे तर मानवनिर्मित व्यवस्था ही त्यास कारणीभूत आहे. तोट्यात जाणारी शेती तसेच जाचक ठरणारे कायदे, राजकिय उदासिनता अशा विविध बाबींमुळे शेतकर्यांची दुरावस्था दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. शेतकऱ्यांना त्यांचे भवितव्य अंधकारमय दिसत असल्याने आत्महत्या वाढीस लागल्या आहेत. शेतकर्यांमध्ये निर्माण होणारी ही नैराश्याची भावना दुर करण्यासाठी जाचक कायदे रद्द करा. ज्या प्रमाणे घटनेने सर्वांनाच संरक्षण व सन्मान बहाल केला आहे. तो शेतकर्यांच्या वाट्याला का नाही ? असा प्रश्न उपस्थित करून संरक्षण व सन्मान शेतकर्यांना मिळाला पाहिजे. यासाठी किसान पुत्रांनी एकजुट दाखवावी आणि समाजमन बदलण्यासाठी सामुहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पदयात्रेचे संयोजक सुभाष कछवे (परभणी), डॉ .राजीव बसरगेकर – मुंबई, मोहन जोशी – पुणे, अभिजीत गुरजर – कोल्हापुर, दिपक नारे – नागपुर, सुधिक कदम – अंबाजोगाई, शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष कालिदास आपेट, मयुर बागुल, नरसिंग देशमुख, बालाजी आबादार, नितिन राठोड, प्रा. रोहिणी पाठक यांची भाषणे झाली.
शेतकरी सहवेदना पदयात्रेचे अंबाजोगाईत जंगी स्वागत
किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने 17 ते 19 मार्च ही तीन दिवसीय पदयात्रा पानगाव ते अंबाजोगाई या प्रमुख मार्गावरून निघाली होती. गेल्या तीन दिवसांपासुन ठिकठिकाणी पदयात्रेचे जोरदार स्वागत झाले. पदयात्रा दुपारी 2 वाजता अंबाजोगाई शहरात पोहोंचली असता पदयात्रेचे शहरातील मान्यवरांनी स्वागत केले. यात माजी मंत्री पंडीतराव दौंड, भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा, ज्येष्ठ नागरिक संघाचे पुंडलिक पवार, रोटरी क्लबचे अध्यक्ष विवेक गंगणे, सचिव प्रा. रोहिणी पाठक, माजी नगरसेवक डॉ. अतुल देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते सुनिल व्यवहारे, डॉ. राहुल धाकडे यांच्यासह मान्यवरांनी पदयात्रेचे स्वागत केले. पदयात्रेचा समारोप आद्यकवी मुकुंदराज सभागृहात झाला.
‘यांचा’ झाला सत्कार
किसानपुत्र आंदोलनाच्या या अन्नत्याग आंदोलनास सहकार्य केलेल्या अनिरूद्ध चौसाळकर, शैलजा बरूरे, बाळासाहेब कराड, रमेश सोनवळकर, राजाभाऊ पिंपळगावकर, मुरलीधर डोने, दत्ता वालेकर, नागनाथ बडे, अशोक कचरे, चंद्रकांत गित्ते, कालिदास आपेट यांचा प्रमाणपत्र देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.