पत्रकार परिषदेत दिली माहिती
अंबाजोगाई : नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नंबर 595 मधील 5 आर खुल्या जागेप्रकरणी आपसात संगनमत करून खोटे दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सलीम मेहंदी पठाण आणि बशिर शेख यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. या संदर्भात पठाण, शेख यांनी शहर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे.
या संदर्भात माहिती देण्यासाठी सलिम पठाण आणि बशिर शेख यांनी शासकीय विश्रामगृहात दिनांक 16 मार्चला पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
पत्रकार परिषदेत माहिती देताना पठाण आणि शेख यांनी सांगितले की, नगर परिषद हद्दीतील सर्व्हे नं. 595 (पारिजात सहकारी गृहनिर्माण संस्था) मधील 5 आर खुली जागा खरेदीखत क्र. 4642/2020 अन्वये खरेदी केली आहे. सदर गृहनिर्माण संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षांच्या कार्यकाळात संस्थेचा एनए – लेआऊट प्लॅन मंजूर झाला आहे.
मात्र, कालांतराने पारिजात गृहनिर्माण सोसायटीचे स्वयंघोषीत अध्यक्ष म्हणून काहीजण वावरू लागले आहेत. या स्वंयघोषीत अध्यक्षांनी मंजूर लेआऊट मधील ओपनस्पेस हा पूर्वीच्या अध्यक्षांना विक्री केला व त्याची बेकायदेशीररित्या अंबाजोगाई नगर परिषदेच्या अभिलेखात मालक म्हणून नोंद करून घेतली. त्यानंतर स्वंयघोषीत अध्यक्ष आणि तत्कालीन अध्यक्ष यांनी आपसात संगनमत करून संस्थेचे अध्यक्ष नसताना देखील पदाचा गैर वापर करत सोसायटीचा ओपनस्पेस खोटे दस्तऐवज वापरून विक्री केला.
पारिजात सोसायटीचे क्षेत्र 60 आर हे भूमिलेख कार्यालयामार्फत निश्चित केले आहे. ते क्षेत्र बायपास रस्त्यास लागुन नसून, जमीन सोडून आहे. असे असताना देखील मंडळ अधिकारी यांची फसवणूक व दिशाभूल करून मालकीच्या जागेचा कसलीही नोटीस न देता पंचनामा करत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला.
फसवणूकीची तक्रार निबंधक कार्यालयात केल्यानंतर सदरील संस्थेचा कारभार बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे. तेंव्हा बनावट दस्तऐवज तयार करून संगनमताने शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पारिजात सहकारी गृहनिर्माण संस्थेचे स्वंयघोषीत अध्यक्ष, विक्री करणारे तत्कालीन अध्यक्ष आणि ओपनस्पेस खरेदी करणाऱ्यांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पोलीस निरीक्षक, अंबाजोगाई शहर यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती सलीम मेहंदी पठाण आणि बशिर शेख यांच्यासह अॅड. पी. डी. खांडेकर यांनी दिली आहे.