अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात आशिया खंडातील पहिले ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयाची मोठी सेवा अवघ्या मराठवाड्याला मिळाली आहे. जुन्या नेतृत्वाच्या कुशाग्र विचारमंथनातून या रुग्णालयाची उभारणी झाली आहे. हे रुग्णालय रुग्णसेवा देण्यासाठी कटिबद्ध असून या ठिकाणची सेवा ही गौरवणीय रहिलेली आहे. परंतू, आज बर्याच आजारांचे निदान होण्यासाठी खाजगी लॅब पर्याय झालेली आहे. अंबाजोगाई येथे रत्नतारा लॅबच्या माध्यमातून रुग्णांच्या अनेक आजारांचे निदान व्हायला मदत होईल, अशी अपेक्षा विधानपरिषदेचे सदस्य आमदार संजय दौंड यांनी व्यक्त केली. सदरबाजार भागात ‘रत्नतारा’ पॅथोलॉजी लॅबच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘स्वाराती’ रुग्णालयाचे मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी उपनगराध्यक्ष दिलीपदादा सांगळे, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा, आयएमए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ. राजेश इंगोले, डॉ.नवनाथ घुगे, डॉ. दिपक लामतुरे, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार संजय दौंड म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे लाखों रुग्णांसाठी वरदान ठरलेले आहे. या रुग्णालयाने मोठी सेवा दिलेली आहे. आजवर लाखों गरीबांच्या व सर्वसामान्यांच्या आजारांवर मात या ठिकाणी करण्यात आलेली आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बदलत चाललेली असून रुग्णांना सुद्धा अनेक आजारांचं निदान होण्यासाठी रक्त तपासणी गरजेची बनलेली आहे. अंबाजोगाई हे मेडिसिन हब बनले आहे. अशा काळात ‘रत्नतारा’ पॅथोलॉजी लॅबच्या माध्यमातून रुग्णांच्या विविध आजारांचे निदान व्हायला मदत होणार आहे.
यावेळी डॉ. नवनाथ घुगे, डॉ. राजेश इंगोले, डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘रत्नतारा’ पॅथोलॉजी लॅबचे संचालक परमेश्वर गित्ते यांनी केले तर आभार लॅबचे संचालक सुशांत पवार यांनी व्यक्त केेले.
या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, पत्रकार उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतिश हौसारे, गणेश गव्हाणे, दादासाहेब कसबे, प्रा. श्रीपती मुंडे, संजय मुंडे, बन्सी सांगळे, सचिन केंद्रे, सचिन वाघमारे, राहुल सांगळे आदींनी परिश्रम घेतले.