अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षकांचे ‘कामबंद’ आंदोलन दिनांक 14 मार्चपासून सुरू झाले आहे. या आंदोलनात जवळपास 100 पेक्षा जास्त प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला आहे. दरम्यान बहुतांश डॉक्टर, प्राध्यापक या आंदोलनात सहभागी झाल्याने ‘स्वाराती’ च्या रुग्णसेवेवर याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू असून आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येथील ‘स्वाराती’ च्या सर्व वैद्यकीय शिक्षकांनी रुग्णालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.
वैद्यकीय शिक्षणाचे खाजगीकरण आणि कंत्राटी नेमणूका शासनाने थांबवाव्यात, अशी मागणी करण्यात येत असून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत वैद्यकीय शिक्षकानी ‘कामबंद’ आंदोलन सुरू केले. अत्यावश्यक आणि कोरोना रुग्णसेवा वगळता ‘स्वाराती’ च्या सर्व रुग्णसेवा ठप्प झाल्या आहेत.
पुढील 15 दिवसांत आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास हे आंदोलन पुढे कायम ठेवले जाईल, असा इशारा देखील वैद्यकीय शिक्षकांनी दिला आहे. कंत्राटी नेमणूका बंद करून सर्व अस्थायी प्राध्यापकांना कायम करावे यासह अन्य मागण्यां वैद्यकीय शिक्षकांनी केल्या आहेत.