मालकी हक्कात घेतल्याशिवाय नळपट्टी, घरपट्टी भरणार नाहीत – कॉ. बब्रुवाहन पोटभरे
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील बहुतांश वस्त्या या भोगवट्यात असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांपासून शहरातील गोरगरिबांना वंचित राहावे लागत आहे. भोगवट्यात असल्याने पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजनांची अंमलबजावणी शहरात प्रभावीपणे झालीच नाही. त्यामुळे शहरातील असंख्य भोगवटाधारकांना घरकुलं मिळाली नाहीत.
यासाठीच शहरातील बेघरांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली निवारा हक्क समितीने आज दिनांक 14 मार्चला घरकुलासाठी आणि नगरपरिषदेने मालकी हक्कात भोगवटाधारकांची नोद घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात शहरातील वस्त्यातील बेघर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. दरम्यान, नगरपरिषदेने मालकी हक्कात नोंद घेतल्याशिवाय नळपट्टी आणि घरपट्टी बेघरांनी भरु नका, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी केले.
या संदर्भात उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबाजोगाई शहरात 1 लाख लोकसंख्या पार झाली असून त्यातील 49 टक्के लोकसंख्या गलिच्छ वस्तीत राहते. लहान – थोर असे एकूण 45 हजार लोकं या वस्त्यात राहत आहेत. यात मागासवर्गीय, मुस्लिम आणि इतर विविध जातींतील बांधवांचा समावेश आहे. शासनाने नगर परिषद, अंबाजोगाईला पत्र पाठवून कळविले आहे की, 30 लाख 97 हजार रुपये भरा आणि भोगवटाधारकांचा सर्वे करून त्यांना मालकी हक्कात घ्या. परंतू, नगरपरिषदेने अद्याप ते पैसे भरले नाहीत. त्यामुळे लोकांची घरे मालकी हक्कात येत नाहीत. मालकी हक्कात येत नसल्याने या बेघरांना पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजनेचा लाभ मिळत नाही.
14 फेब्रुवारीला याच मागण्यांसाठी आंदोलन झाले होते. नगरपरिषद आणि उपजिल्हाधिकारी आवास योजनेतील मुख्य कार्यकारी निर्णय अधिकारी आहेत. आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी महसूल आणि नगरपरिषद निष्क्रिय असून जनतेच्या दुःखात भर घालीत आहे. आम्ही संसदीय मार्गाने हक्कांसाठी आंदोलन सुरू केले आहे. आपण जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हेटाळणी केली तर असंतोषाचा भडका उडेल, असा इशारा आम्ही देत आहोत.
शहरातील शेकडो एकर जमिनीवर धनदांडग्यांनी अतिक्रमणे केली आहेत. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते, याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष धिक्कार करतो. शहरात सार्वत्रिकपणे या गलिच्छ वस्त्यांत घरकुल योजनांची अंमलबजावणी करा. 14 एप्रिलपर्यंत यावर अंमल झाला नाही तर पुढे होणाऱ्या आंदोलनाची जबाबदारी महसूल आणि नगरपरिषद, अंबाजोगाई यांची राहिलं. या निवेदनावर कॉ. बब्रुवाहन पोटभरे, विनोद शिंदे, कॉ. भागवत जाधव, कॉ. देविदास जाधव, कलिमा शेख, शेख नूर, रवि आवाडे, पुष्पा सरवदे, अविनाश कु्ऱ्हाडे यांच्या सह आदींच्या सह्या आहेत.