100 पेक्षा जास्त महिलांनी केली रक्त तपासणी
अंबाजोगाई : ‘इनरव्हील’ क्लब, मानवलोक जनसहयोगच्या संयुक्त विद्यमाने शहरातील घरकाम करणाऱ्या महिलांसाठी तसेच बचत गट महिलांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 100 पेक्षा अधिक गरजू महिलांनी आपली रक्त तपासणी करून घेतली.
थायरॉईड, सीबीसी काऊन्ट, हिमोग्लोबिन, शुगर अश्या विविध तपासण्या करण्यात आल्या. या प्रसंगी ‘इनरव्हील’ क्लबच्या अध्यक्षा अंजली चरखा यांनी प्रास्ताविक करताना शिबिराच्या आयोजनामागील भूमिका मांडताना असे सांगितले की, घरकामासाठी जाणाऱ्या महिला ह्या आवश्यक असलेल्या तपासण्या केवळ पैशाअभावी त्या करू शकत नाहीत. त्यामुळे रोग निदान होण्यास विलंब होतो. म्हणून क्लबच्या पुढाकाराने व हिंद लॅब अंतर्गत अभिजीत खरात आणि आदित्य जगताप यांच्या मदतीने ह्या चाचण्या करण्यात आल्या.
स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रगती मुंडे यांनी यावेळी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. त्यांनी आलेल्या अहवालाचे अवलोकन करून मोफत सल्ला देण्याचेही आश्वासन दिले. यावेळी क्लब मार्फत उपस्थित महिलांना प्रथिनेयुक्त राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मानवलोक जनसहयोगच्या कल्पना लोहिया यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी ‘इनरव्हील’ क्लबच्या या कामाचे कोतूक केले. क्लबच्या चंद्रकला देशमुख, सुहासिनी मोदी, रंजना कराड, सोनाली कर्नावट, संगीता नावंदर, वर्षा देशमुख, जयश्री कराड, अनिता फड व इतर ‘इनरव्हील’ मेंबर्स उपस्थित होते. तसेच मानवलोकचे शाम सरवदे, संजना आपेट व सावित्री यांनी हे शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. क्लबच्या सचिव मेघना मोहिते यांनी सर्वांचे आभार मानले.