‘झुंड’ ला मिळाली जबरदस्त रेटिंग : चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरुच

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अभिनित ‘झुंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपटाबाबत प्रेक्षक आणि समीक्षकांसोबत अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांकडूनही चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरु आहे. 

यादरम्यान आयएमडीबीने (इंटरनेट मूव्ही डाटा बेस) ‘झुंड’ या चित्रपटाला 10 पैकी रेटिंग दिलं आहे तर आयएमडीबीने दिलेलं रेटिंग पाहून अमिताभ बच्चन यांनी हे खूपच दुर्लभ असल्याचं म्हटलं आहे. चित्रपटांना रेटिंग देणारी लोकप्रिय वेबसाईट आयएमडीबीने ‘झुंड’ या चित्रपटाला 10 पैकी 9.3 रेटिंग दिलं आहे. 

अमिताभ बच्चन यांच्या एका चाहत्याने यासंदर्भात एक ट्विट शेअर करत त्यामध्ये अमिताभ यांना टॅग केले. तर अमिताभ बच्चन यांनी हे ट्विट रिट्विट करत ‘हे खूपच दुर्लभ आहे’, असल्याचे म्हटले. त्यानंतर अमिताभ यांच्या या ट्विटवर अनेकजण कमेंट करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. तसेच ‘झुंड’ चित्रपटात त्यांनी उत्कृष्टपणे काम केल्याचे सांगत त्यांचे कौतुक करत आहेत.

दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट नागपूरमधील निवृत्त क्रीडा प्रशिक्षक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना फुटबॉलचे ट्रेनिंग देऊन त्यांना एक नवीन जीवन दिले. तर चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विजय बरसे यांची भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर मुख्य भूमिकेत आहेत.

यासोबतच या चित्रपटात फुटबॉल खेळणाऱ्या मुलांच्या भूमिकेसाठी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची निवड करण्यात आली. नागराज मंजुळे यांना वाटले की, जर चित्रपटातील पात्रांना योग्य न्याय द्यायचे असेल तर तशा प्रकारची मुलेच देऊ शकतात. परंतु, या चित्रपटातील अनेक कलाकार पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले होते. असे असतानाही नागराज मंजुळे यांनी उत्तमरित्या सर्वांकडून अभिनय करून घेतला.