मुंबई : गावपातळीवर तलाठी हा महत्त्वाचा घटक असून अनेक सजांमध्ये तलाठी कार्यालयाजवळच त्यांचे निवासस्थान बांधण्यात आले आहे. राज्यातील सर्व तलाठ्यांना त्यांच्या सजातच थांबण्याच्या सूचना असून यानंतरही जे तलाठी सजांमध्ये राहणार नाहीत, त्यांचे घरभाडे बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथील तलाठी कार्यालय बंद असल्याबाबत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना महसूलमंत्री थोरात म्हणाले की, 7/12 उताऱ्यासह इतर सर्व महसूल कामकाजाचे संगणकीकरण केलेले असून ते कागदपत्रे आता कुठेही ऑनलाईन उपलब्ध होऊ शकतात, तरीही ही कामे वेळेवर व्हावीत, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील.
आंबीदुमाला गावात नियमित तलाठी नियुक्त करण्यात आले असून वीजेची अडचण असली तरी लॅपटॉपद्वारे संगणकीकृत 7/12 उतारे दिले जात आहेत. या कार्यालयाचा वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेऊ असे सांगून आंबीदुमाला भागात अवैधपणे गौण खनिज उत्खनन केले जात असल्याच्या तक्रारीची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल, असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.