अंबाजोगाईत पुन्हा चोरी : सारडा नगरीत पोलिसांचेच फोडले घर

लाखोंचा ऐवज लंपास : गुन्हा दाखल

अंबाजोगाई : शहरातील वाढत्या चोरींचं सत्र काही थांबत नसून चोरट्यांनी चक्क पोलिसांचेच घर फोडून लाखों रुपायांचा ऐवज चोरुन नेला आहे. या घटनेमुळे ‌‌‌शहरात खळबळ उडाली असून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक 4 ते 7 मार्चच्या दरम्यान घडली आहे.

या बाबत प्राप्त माहिती अशी की, अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात एपीआय रवींद्र शिंदे हे सध्या वाचक पदावर कार्यरत आहेत. शिंदे हे शहरातील पोखरी रोडवरील पिताजी सारडा नगरीत राहतात. त्यांची पत्नी कोमल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 4 मार्चला सर्व कुटुंबीय घराला कुलूप लावून बीडला गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराची कडी तोडून घरात प्रवेश करत सोन्याचांदीचे दागिने आणि मनगटी खड्याळ असा एकूण एकूण 1 लाख 26 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

शिंदे कुटुंबीय 7 मार्चला रात्री 11 वाजता घरी परतले असता त्यांना घराचा कडी – कोयंडा तुटलेला दिसला. त्यानंतर घरात जाऊन पहिले असता चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त टाकून कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने चोरुन नेल्याचे दिसून आले. सदर फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा रजि. न. 97/22 कलम 454, 457 380 नुसार नोंद करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय ज्ञानेश्वर गव्हाणे करत आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करून तपास करण्यात आला. परंतु, चोरीच्या घटनेला 48 तासांपेक्षाही अधिक काळ झाल्याने या तपासातून फार काही निष्पन्न झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.