सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन – युवासेना उपजिल्हाप्रमुख विनोद पोखरकर
मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
अंबाजोगाई : कोरोना काळातील मालमत्ता कर व त्यावरील दंडाची रक्कम माफ करून जेवढे पाणी दिले तेवढ्याच दिवसांची पाणीपट्टी आकारा, अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद पोखरकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
युवासेनेच्या वतीने सोमवार, दिनांक 7 मार्चला मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद पोखरकर, केज विधानसभा अधिकारी अभिमन्यू वैष्णव, युवासेना तालुकाप्रमुख अक्षय भुमकर, तालुका संघटक समाधान पिसाळ यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
युवासेनेकडून दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अंबाजोगाई शहरातील नागरिकांची गत 2021 वर्षातील एप्रिल व मे अशा दोन महिन्यांतील लाॅकडाऊनच्या काळातील नळपट्टी कर आकारणी माफ करून देण्यात यावी. लॉकडाऊन काळातील नळपट्टीच्या कर वसुलीवर व्याजही माफ करण्यात यावे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थीती बिकट झालेली असून या दोन महिन्यांच्या लॉकडाऊन काळातील नळपट्टी कर व त्यावरील दंड माफ करून अंबाजोगाई शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य करावे. त्याचबरोबर आठवड्यात एक दिवसाला नळाला पाणी येत असताना देखिल आठवड्याची पाणी पट्टी आकारली जाऊ नये. प्रत्येक महिन्यांतील जेवढे दिवस नागरिकांना पाणी मिळेल, तितक्याच दिवसांची पाणीपट्टी घेण्यात यावी.
यावर येत्या सात दिवसांत निर्णय घ्यावा. अन्यथा सात दिवसांनंतर नाविलाजास्तव युवासेनेच्या माध्यमातून अंबाजोगाईकरांना न्याय मिळवून देण्यासाठी नगरपरिषद प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. झालेल्या नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील, असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद पोखरकर यांच्याकडून देण्यात आला आहे. निवेदन देताना प्रतिष्ठीत उद्योजक गजानन देशपांडे उपस्थित होते.