तहसील कार्यालयावर अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा
अंबाजोगाई : शेतकऱ्यांचा 2020 चा पिकविमा, अतिरिक्त उसाचा प्रश्न व 25 टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळवून दिल्याशिवाय महाराष्ट्र राज्य किसान सभा स्वस्थ बसणार नाही, असा इशारा कॉ. अजय बुरांडे यांनी दिला आहे.
अंबाजोगाई तहसील कार्यालयावर आज दिनांक 8 मार्चला अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांचा पीकविमा, अतिरिक्त ऊस तसेच 25 टक्के थकलेले अनुदान या प्रश्नावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कॉ. बुरांडे बोलत होते.
किसान सभेचे बीड जिल्हा सेक्रेटरी कॉ. अजय बुरांडे मोर्चाला संबोधित करताना म्हणाले की, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने पीकविम्याच्या प्रश्नावर मागील तीन वर्षांपासून तहसील, जिल्हाधिकारी, कृषी आयुक्त व कृषी मंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा केलेला आहे. तसेच झालेल्या आंदोलनामुळे सन 2018 चा शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला. किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या पिकविमा दिंडीमुळे 2021 चा अग्रीम विम्याचा पहिला हप्ता मिळाला आहे. याही पुढे 2020 – 21 चा पिकविमा नुकसानीच्या प्रमाणात सरसकट सर्व शेतकर्यांना तातडीने जमा केला पाहिजे. यावर्षीच्या अतिवृष्टी अनुदानाचा 25 टक्के रकमेचा राहिलेला दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याशिवाय किसान सभा स्वस्थ बसणार नाही, असे कॉ. बुरांडे म्हणाले.
बीड जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचे लवकरात लवकर गाळप करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी करावे, शेतकऱ्यांना योग्य दाबाने किमान आठ तास अखंडितपणे शेतीसाठी विद्युत पुरवठा करण्यात यावा यासह रासायनिक खतांची दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, अशा मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. दरम्यान तहसील प्रशासनाने मागण्यांबाबत तात्काळ प्रतिसाद देत कारखान्याचे सीईओ व किसान सभेच्या शिष्टमंडळाबरोबर 9 मार्चला बैठक घेण्याचे मान्य केले आहे.
यावेळी बीड जिल्हा किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. मुरलीधर नागरगोजे, उत्तरेश्वर इंगोले, प्रशांत मस्के, दिनेश शेप, रवी देवरवाडे, जगन्नाथ घाळे, दत्तात्रेय नेवल, विष्णू जाधव, राहुल हाके, आनंद केंद्रे, सौदागर कदम, अशोक शेळके, योगीराज गडदे, सुहास चंदनशिव यासह मोठ्या प्रमाणात तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.