महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा

बसव ब्रिगेडची मागणी

अंबाजोगाई : औरंगाबाद येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करा, अशी मागणी लिंगायत समाज व बसव ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.     

या संदर्भात उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, भारतातील थोर समाजसुधारक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची औरंगाबाद येथील बजाजनगर भागात काही अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली आहे. या घटनेचा अंबाजोगाई येथील समस्त लिंगायत समाज आणि बसव ब्रिगेड यांच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. या प्रकरणी गुरुवार, दि.10 मार्चला आपणास निवेदन देत आहोत. 

जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा तोडून विटंबना केली ही घटनाच निषेधार्ह आहे. महात्मा बसवेश्वर हे थोर समाजसुधारक आहेत. त्यांच्या विचारांचा प्रभाव जगभर पसरला आहे. अशा महान महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात व्हावी, ही घटना खेदजनक आहे. या घटनेतील आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करून सदरील आरोपींना त्वरीत जेरबंद करावे, अन्यथा याप्रश्नी समस्त लिंगायत समाज व बसव ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.      

या निवेदनावर बसव ब्रिगेडचे विनोद पोखरकर, डॉ. निशिकांत पाचेगावकर, उमाकांत शेटे, गणेश काळे, जगदीश ढेले, दिपक मंगे, नागनाथ वारद, महेश्वर चिल्लरगे, महेश उरगुंडे, शंकर बुरांडे, प्रसाद कोठारे, एस. के. निर्मळे, आर. एस. मठपती आणि समस्त लिंगायत समाज, अंबाजोगाई आणि बसव ब्रिगेड, मराठवाडा विभागातील इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.