‘मूकनायक’ प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातील एक बुलंद आवाज होता – अॅड. संदिप थोरात
अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने ‘मूकनायक’ दिनाचे आयोजन
राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्कार सुधाकर कश्यप यांना प्रदान
अंबाजोगाई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली पत्रकारिता ही समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित, शोषित व पिडित घटकांसाठी केली. त्यावेळची पत्रकारिता ही मूठभर लोकांच्या हातात होती. परंतु बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता व्यापक होती. त्यामध्ये अन्यायाचा प्रतिकार करण्याची ताकद होती, असे मत माजी ग्रामविकास राज्यमंत्री अॅड. पंडितराव दौंड यांनी व्यक्त केले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता म्हणजे त्याकाळच्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातील एक बुलंद आवाज होती, असे प्रतिपादन जेष्ठ विधिज्ञ तथा विचारवंत अॅड. संदिप थोरात यांनी केले. अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने 26 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या ‘मूकनायक’ दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी ग्रामविकास राज्यमंत्री अॅड. पंडितराव दौंड, स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव गोरे उपस्थित होेते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्कार हा मुंबई येथील जेष्ठ पत्रकार सुधाकर कश्यप यांना प्रदान करण्यात आला. कश्यप हे तांत्रिक अडचणीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे हा पुरस्कार त्यांचे प्रतिनिधी विकास गजभारे यांना देण्यात आला. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाजातील वेगवेगळ्या घटकात आदर्शवत काम करणार्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. ज्यामध्ये घांटनांदूर येथील सेवा आश्रमचे प्रमुख नामदेव दहिवाळ, अलहाज मोहम्मद अब्दुल हकीम, डॉ. क्रांती सिरसाट, राजेंद्र घोडके, प्राचार्य. डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रा. डॉ. इंद्रजित भगत, डॉ. संतोष बोबडे, दिपक जाधव, अंकिता महिला बचतगट यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी ग्रामविकास राज्यमंत्री अॅड. पंडितराव दौंड म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात प्रसिद्धीचे किंवा लोकांपर्यंत पोहचण्याचे आणि चळवळीला बळकटी देण्याचे माध्यम नव्हते. अशा काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक या वृत्तपत्राची सुरुवात करुन त्या काळात समाजजागृतीचे काम केले. बाबासाहेबांनी वृत्तपत्र हे चळवळीसाठी आणि तळागाळातील लोकांसाठी समर्पित केलेले होते. बाबासाहेब हे खूप मोठे विद्वान व विचारवंत होते. भारतीय राज्यघटनेची निर्मिती करत असतानासुद्धा त्यांनी समाजातील जेवढ्या जाती, जमाती, धर्म, पंथ याचा विचार करुन कायद्याची निर्मिती केली. संविधानामध्ये ज्या तरतुदी नमुद केल्या आहेत. त्यामुळेच आज वेगवेगळ्या घटकांना न्याय मिळविण्यासाठी सोयींचे जाते. बाबासाहेबांच्या व्यापक कार्याचा आणि त्यांच्या पत्रकारितेचा सन्मान म्हणून अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने ‘मूकनायक’ दिनाचे आयोजन करून खर्या अर्थाने त्यांच्या विचारांना व लेखणीला अभिवादन केले, असे दौंड यांनी सांगितले.

अॅड. संदिप थोरात म्हणाले की, बाबासाहेब हे अथांग व्यक्तीमत्व असून ते चार – दोन दिवसाच्या व्याख्यानातून किंवा प्रबोधनातून समजणारे नाही. बाबासाहेबांनी भारत देशासाठी व इथल्या मानवजातीसाठी खूप मोठे योगदान दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता आणि त्यांचे लेखण कौशल्य अनेकांना भावलेले आहे. बहुजन समाज हा कायम दुर्लक्षित राहिलेला घटक होता. तत्कालीन व्यवस्थेमध्ये बहुजनाला कसलेही स्थान नव्हते. कारण विशिष्ट लोक पत्रकारिता करत असल्याने इतर समाजाविषयी त्यांना देणे – घेणे नव्हते, म्हणून बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ च्या माध्यमातून समाजातील सर्व जाती धर्माच्या घटकांना एकत्र बांधून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या लेखणीचा प्रहार हा तडाखेबंद होता. इंग्रज सरकार असो की, आपली त्यावेळची व्यवस्था असो, यांना पर्याय देण्याचे काम त्यांनी केले. बाबासाहेबांनी पत्रकारिता ही अत्यंत सोप्या भाषेत लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला, ज्याचा परिणाम व्यवस्थेवर झाला. बाबासाहेबांची पत्रकारिता ही जनकल्याणाची व लोकहिताची होती, असे अॅड. थोरात यांनी सांगितले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिला. जर बाबासाहेब नसते तर बहुजनानां स्वतःची ओळख राहिली नसती. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या घटकांना समन्यायाची भुमिका प्राप्त करून दिली. ज्याची उतराई येणार्या हजारो वर्षातसुद्धा होणार नसल्याचे मोदी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमेश्वर गित्ते यांनी केले तर बहारदार सुत्रसंचालन रचना परदेशी हिने केले. आभार अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव गोरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ पत्रकार जगन सरवदे, भाऊसाहेब गाठाळ, प्रा. प्रदिप तरकसे, दादासाहेब कसबे, रोहिदास हातागळे, धनंजय जाधव, सचिव गणेश जाधव, दत्ता वालेकर, रत्नदीप सरवदे, काकासाहेब वाघमारे, अरुण गित्ते यासह आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.