अंबाजोगाई : प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने जानेवारी 2022 मध्ये घेण्यात आलेल्या ‘बालझुंब्बड -2022’ मधील विविध स्पर्धांच्या विजेत्यांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते येत्या शुक्रवारी म्हणजेच 5 मार्चला होणार आहे. तेंव्हा स्पर्धेत सहभागी विजेत्यांनी आपापली बक्षीसं घेण्यासाठी हजर राहावे, असे आवाहन प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख दिनकर जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
मागील 20 वर्षांपासून प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ अंबाजोगाई तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना एक व्यासपीठ मिळावे, या उदात्त उद्देशाने तालुकास्तरीय ‘बालझुंब्बड’ चे आयोजन करत आहे. यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शाळा मोठया संख्येने सहभागी होत असतात.

विद्यार्थ्यांसाठी ‘बालझुंब्बड’ हा एक आनंदोत्सवच असतो. त्यामुळे विद्यार्थी यामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचा गट हा विजेता ठरेलचं असे नाही. तरी देखील आपली कला व आपली संस्कृती याद्वारे सादर करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतांना दिसून येतात.
‘बालझुंबड’ मध्ये इयत्ता 1 ली ते 4 थी, 5 वी ते 7 वी आणि 7 वी ते 10 वी असे गट तयार करून यामध्ये प्रामुख्याने रंगभरण स्पर्धा, वैयक्तीक व समूह नृत्य स्पर्धा, प्रश्न मंजुषा, चित्रकला स्पर्धा तसेच विज्ञान शोध स्पर्धांचे आयोजन अत्यंत यशस्वीपणे करण्यात आले होते. या संपूर्ण स्पर्धांच्या विजेत्यांचे बक्षिसं वितरण येत्या 5 मार्चला शुक्रवारी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आले आहे.