अंबाजोगाईत रघुनाथ नेत्रालयाचे उद्घाटन
अंबाजोगाई : लोकनेते, सहकार महर्षी अशोकराव देशमुख यांच्या अमृतमहोत्सव निमित्त अंबाजोगाईत दृष्टीदाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे उद्घाटन रविवारी सकाळी झाले. यावेळी झालेल्या मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिरात 1500 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. तपासणी झालेल्या 500 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.
नेत्र तपासणी शिबिराचे व रघुनाथ नेत्रालयाचे उद्घाटन डॉ. लहाने यांच्या मातोश्री श्रीमती अंजनाबाई लहाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. नमिता मुंदडा, आ. संजय दौंड, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, मानवलोकचे अध्यक्ष अशोकराव देशमुख, कार्यवाह अनिकेत लोहिया, नंदकिशोर मुंदडा, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, डॉ. भास्कर खैरे, माजी उपनगराध्यक्ष दिलीपदादा सांगळे यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कोरोनाच्या काळात विविध अडचणीमुळे मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. परिणामी अनेक वृद्धांना अंधत्वाचा सामना करण्याची वेळ आली होती. या वृद्धांना योग्यवेळी उपचार मिळणे गरजेचे होते. या उद्देशाने लोकनेते अशोकराव देशमुख अमृतमहोत्सव समितीच्या वतीने व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालय याचे उद्घाटन या दुहेरी संगमातून हे मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या झालेल्या नेत्र तपासणी शिबिरात डॉ. तात्याराव लहाने, ‘स्वाराती’ चे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, डॉ. रागिणी पारेख व वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र विभागाच्या डॉक्टरांनी रुग्ण तपासणीसाठी सहकार्य केले. या तपासणी शिबिरातील 500 आवश्यक रुग्णांवर लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया होणार आहेत.
रघुनाथ नेत्रालयात आल्या 45 लक्ष रुपयांच्या विविध मशिनरी
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी रुग्णांच्या सेवेसाठी अंबाजोगाईत रघुनाथ नेत्रालय सुरू केले आहे. दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या रविवारी स्वतः डॉ. लहाने व त्यांची टीम नेत्र तपासणी करणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया ही होणार आहेत. याचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले आहे.