देशाचा खरा इतिहास लपवून ठेवला जातो – माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील

अशोकराव देशमुखांनी जनतेच्या विधानसभेतच राहाणे पसंत केले : प्रा. सोमनाथ रोडे 

अशोकराव देशमुखांचा अमृतमहोत्सवी सत्कार 

अंबाजोगाई : देशाचा खरा इतिहास लपवून ठेवला जातो, ही मोठी शोकांतिका आहे, अशी खंत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केली. सहकारमहर्षी अशोकराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत सोमनाथ रोडे, पद्मश्री तात्याराव लहाने, सत्कारमूर्ती अशोकराव देशमुख व त्यांच्या सुविद्य पत्नी व्दारकाबाई देशमुख यांची उपस्थिती होती.

माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील बोलताना म्हणाले की, ज्यांच्याकडे जे कमी आहे, ते त्याला देणे, यासाठी सहकार चळवळ आणली आहे. इथे तात्विक विरोध केला की ‘ईडी’ लावला जातो. केंद्र सरकारच्या चूकीच्या धोरणांमुळे सार्वजनिक उद्योगातील नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योग कवडीमोल भावात विकले गेले आहेत. सहकारी साखर कारखाने आता खासगी झाले आहेत, असे कोळसे पाटील म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत सोमनाथ रोडे म्हणाले की, राजकारण व समाजकारणात वावरताना अशोकराव देशमुखांनी आमदारकीची खंत कधीही बाळगली नाही. त्यांनी जनतेच्या विधानसभेतच राहण्याचे पसंत केले. राजकारणासह सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य सर्वांना माहित आहे. परंतू, सध्या सहकाराची अवस्था न सांगण्यासारखी आहे. देशाच्या लोकशाहीत महत्वाचे दोन प्रश्न भेडसावत आहेत. त्यात बेरोजगारी व विषमता हे दोन प्रश्न मोठे आहेत. विषमतेची दरी कमी होण्याऐवजी ती वाढतच आहे. ही विषमता संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न न झाल्यास देशाच्या लोकशाहीला धोका असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

डॉ. तात्याराव लहाने यांनी आपल्या प्रास्ताविकात अशोकराव देशमुखांच्या विविध आठवणी सांगितल्या. सर्वांनी एकत्र येवून त्यांचा हा अमृतमहोत्सवी सन्मान केल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना अशोकराव देशमुख यांनी जुन्या चळवळीतील अनेक आठवणी सांगितल्या. या आठवणी सांगताना त्यांना गहिवरून आले. त्यांच्या सोबत जे मित्र होते, त्यांनाही ते विसरले नाहीत. मी कुठला लोकनेता व सहकारमहर्षी नाही, मला शेवटपर्यंत कार्यकर्ताच राहू द्या, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

सत्काराला मोठी गर्दी

अशोकराव देशमुख यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मुकुंदराज सभागृह गच्च भरले होते. उपस्थितांची भाषणे झाल्यानंतर अशोकराव देशमुखांचा आदरपूर्वक सत्कार करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. विविध गावचे सरपंच, सेवा संस्थेचे अध्यक्ष, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, त्यांच्या माकेगावचे सर्व ग्रामस्थ, नातेवाईक आदींनी त्यांचा स्नेहपूर्ण सत्कार केला.   

यावेळी सन्मानपत्राचे वाचन अभिजीत जोंधळे यांनी केले. सूत्रसंचालन आनंद टाकळकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी अशोकराव देशमुख अमृत महोत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला.