बागझरी : ‘त्या’ 3 बालकांच्या आईचाही मृत्यू

‘स्वाराती’ त सुरु होते उपचार : पोलीस अधीक्षकांची भेट

अंबाजोगाई : बागझरी येथे एकाच कुटुंबातील तीन बालकांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली असून बालकांच्या आईवर येथील ‘स्वाराती’ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बालकांच्या आईचाही मृत्यू झाला असल्याने बागझरी गावांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला ते अद्याप स्पष्ट झालं नसून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथील रहिवासी काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या कुटुंबातील 3 बालकांसह पत्नी अशा 4 जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी दि. 26 फेब्रुवारीला सकाळी उघडकीस आली होती. यात साधना (वय 6), श्रावणी (वय 4) आणि (8 महिन्याच्याचं बाळ) अशा 3 बालकांचा मृत्यू झाला होता तर पत्नी भाग्यश्री (वय 30) यांची देखील प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर ‘स्वाराती’ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्यांचाही मृत्यू झाला आहे.

शुक्रवार दि. 25 फेब्रुवारीला रात्रीच्या जेवणानंतर ही विषबाधा झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आ. संजय दौंड यांनी ‘स्वाराती’ रुग्णालयात भेट दिली. काशीनाथ दत्तू धारासुरे यांना 3 एकर जमीन असून ते मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 

पोलीस अधीक्षक यांची भेट

अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथील घटनेचे गांभीर्य ओळखून बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ए. राजा यांनी बागझरी या गावाला भेट दिली असून ‘स्वाराती’ रुग्णालयात जाऊन देखील घटनेची माहिती घेतली आहे. त्यांच्या समवेत पोलीस कर्मचारी उपस्थित होते.