अंबाजोगाई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्षपदी अंबाजोगाई तालुक्यातील ज्येष्ठ नेते राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत चव्हाण यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. चव्हाण यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, माजी आमदार अमरसिंह पंडित, मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष अशोक डक, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, परळी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, युवती आघाडीच्या अध्यक्षा कु. सक्षणा सलगर आदींची उपस्थिती होती.
या नियुक्ती संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपले सहकार्य राहील, असा मला विश्वास आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले राजेश्वर चव्हाण हे मूळचे अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथील रहिवासी असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत आहेत. शरद पवार यांचे ते एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात.
दरम्यान नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी खा. शरदचंद्र पवार यांचे विचार जोपासत बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बळकटीकरण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, असा विश्वास व्यक्त करत, जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल सर्व पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त केले आहेत.