मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ ‘महाविकास आघाडी’ चे कार्यकर्ते आक्रमक

मोदी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी

अंबाजोगाई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून भाजपा सरकारच्या विरोधात काळ्या फिती बांधून अंबाजोगाई येथे आज दिनांक 25 फेब्रुवारीला आंदोलन केले.

यावेळी केंद्र सरकार विरोधात ‘नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेंगी’ अशा घोषणा देत मोदी सरकारचा निषेध व्यक्त करत नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन केले.

या आंदोलनात विधान परिषद सदस्य आ. संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे, माजी उपसभापती तानाजी देशमुख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.