अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्कार टी. व्ही. 9 चे सुधाकर कश्यप यांना जाहीर

26 फेब्रुवारीला मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे आयोजन : शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्कार यंदा टी. व्ही. 9 चे क्राईम इडिटर सुधाकर कश्यप (मुंबई) यांना जाहीर झाला असून दि. 26 फेब्रुवारी 2022 ला मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यासोबतच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव सोहळा देखील याच दिवशी होणार असल्याची माहिती अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय वृत्तपत्र सृष्टीत अगणित योगदान आहे. त्यांच्या प्रखर व तेजस्वी लेखणीने भारतीय लोकशाही अधिक मजबूत झाली. अशा महामानवाने ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र 31 जानेवारी 1920 रोजी उपेक्षित, शोषित, पिडीतांसाठी समर्पित केले. त्या निमित्ताने अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने 31 जानेवारीला दरवर्षी ‘मूकनायक’ दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतू या वर्षी कोविडच्या पार्श्र्वभूमीवर हा कार्यक्रम 26 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे.

‘मूकनायक’ दिनानिमित्त देण्यात येणारा ‘मूकनायक’ पुरस्कार यंदा टी. व्ही. 9 चे क्राईम इडिटर सुधाकर कश्यप यांना जाहीर झाला आहे. सुधाकर कश्यप यांनी ‘आयबीएन लोकमत’, ‘महाराष्ट्र 1’ यासह अनेक वृत्तवाहिन्यांत क्राईम रिपोर्टर म्हणून काम केले असून सध्या ते टी. व्ही. 9 चे क्राईम इडिटर आहेत. माजी राज्यमंत्री पंडीतराव दौंड यांच्या हस्ते व‌ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कश्यप यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे, ‘स्वाराती’ चे‌ अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात वैद्यकीय पीजी परिक्षेत राज्यात मागासवर्गीयांमधून प्रथम आलेल्या डॉ. क्रांती सिरसाठ, सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक कार्य करणारे लालाजी तुळजाराम दहिवाळ महाराज, (घाटनांदूर) राजेंद्र घोडके, अलहाज मोहमद अब्दूल हकीम साहब, कृषी महाविद्यालयात विशेष लक्ष देऊन परिसराचा कायापालट करणारे डॉ. बाबासाहेब ठोंबरे, नुकतीच पीएच.डी. पदवी प्राप्त केलेले डॉ. इंद्रजित भगत, डॉ. संतोष बोबडे, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देशाच्या राजधानीत दिल्ली येथे विधी व न्याय मंत्रालयात स्विय सहायक पदासाठी निवड झालेले दिपक जाधव आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत अत्यंत चांगल्या पद्धतीने बचत गट चालवून तो‌ नफ्यात‌ आणण्यासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अंकिता महिला बचत गटाचा (खडकपूरा) सन्मान‌ यावेळी करण्यात येणार आहे.

‘मूकनायक’ दिनाचा हा कार्यक्रम नगर परिषदेच्या स्व. विलासराव देशमुख सभागृहात 26 फेब्रुवारीला शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव गोरे, सचिव गणेश जाधव, संघाचे ज्येष्ठ सदस्य जगन सरवदे, प्रा. प्रदिप तरकसे, भाऊसाहेब गाठाळ, परमेश्वर गित्ते, दादासाहेब कसबे, रोहिदास हतागळे, धनंजय जाधव, विश्वजीत गंडले, प्रवीण कुरकूट, रत्नदिप सरवदे, रविंद्र अरसुडे, दत्ता वालेकर यांच्यासह आदी सदस्यांनी केले आहे.