अन् मराठी ‘श्रीवल्ली’ कार विजयच्या गालावर आनंदाची कळी खुलली

‘तुझी झलक वेगळी श्री वल्ली, काळजात तू भरली’ अशा मराठी ‘श्रीवल्ली’ कार विजय खंडारे या तरुणाला महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून नुकतीच प्रोफेशनल फोटो आणि व्हिडीओ कॅमेऱ्याची अनपेक्षित भेट मिळाली. या अनोख्या भेटवस्तूमुळे आपल्याला आनंद झाला असून, ताईंनी दिलेल्या शाब्बासकीने यापुढे अधिक चांगलं काम करून दाखविण्याचं बळ मिळाल्याची प्रतिक्रिया विजयने व्यक्त केली आहे.

तब्बल 15 दशलक्षहून अधिकवेळा युट्यूबवर पाहिले गेलेले ‘तुझी झलक वेगळी श्री वल्ली, काळजात तू भरली’ हे गाणं अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील विजय खंडारे या तरुणाने बनविले आहे. बीएससीचे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेला विजय अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आला. लहानपणी भाजी विक्रीपासून हमालीपर्यंतची कामे त्याने केली आहेत. 

मात्र टिक टॉक ॲपपासून आपल्या सोशल प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आणि अस्सल वऱ्हाडी बोली भाषेतील मनोरंजक व्हिडिओ व ब्लॉगद्वारे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. टिक टॉक बंद झाल्यानंतर विजय युट्यूबकडे वळला व अल्पावधीतच त्याला लोकप्रियता मिळत गेली. सुपरहिट ‘श्रीवल्ली’ गाण्याच्या मराठी आवृत्तीने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहाेचविले. याची दखल घेत ॲड. ठाकूर यांनी विजय खंडारेसह त्यांचे कुटुंबिय आणि टीमचा गौरव केला. यावेळी अनपेक्षित भेटवस्तू देण्याचे त्याला सांगितले होते. त्यानुसार अमरावती जिल्हा दौऱ्यावर असताना ॲड. ठाकूर यांनी विजयकडे प्रोफेशनल फोटो आणि व्हिडीओ कॅमेरा दिला.