अंबाजोगाई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हा महिला जिल्हाध्यक्षांवर त्यांच्याच दत्तक घेतलेल्या मुलाच्या पत्नीने मारहाणीसह आदी गंभीर आरोप केले आहेत. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत (दि. 20) पिडीत महिलेने सदरिल आरोप केले आहेत. दरम्यान या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली असल्याचेही महिलेने सांगितले आहे.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पिडीत महिलेने सांगितले की, बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा संगिता तुपसागर यांनी त्यांच्या दत्तक घेतलेल्या मुलाचे पहिले लग्न झालेले असतानाही अंधारात ठेवून, खोटी माहिती देऊन 19 सप्टेंबर 2021 ला लग्न लावून दिले. लग्नाच्या नंतर गेली पाच महिने घरातील सर्व कामे करुन घेत जाणूनबुजून संगिता तुपसागर मारहाण करून त्रास देत आहेत. कधी अंगावर गरम पाणी टाकणे तर कधी वाटेल त्या धमकी देत आहेत. या गोष्टींना कंटाळून शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे. त्यासोबतच सदरिल पिडीत महिलेने अनेक गंभीर आरोप संगिता तुपसागर यांच्यावर केले आहेत. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा अंजली पाटील, वर्षा रायभोळे यांची उपस्थिती होती.
महिला आयोगाकडे दाद मागणार
सदरिल पिडीत महिलेला लग्न झाल्यापासून जाणूनबुजून त्रास होत असून त्यांच्या जाचाला कंटाळून पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही राज्य महिला आयोगाकडे रितसर तक्रार दिली आहे. तिला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा अंजली पाटील यांनी दिला आहे.