अंबाजोगाई : ‘शिवजन्मोत्सव’ निमित्त जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला तिलांजली देत शहरात मिरवणूक आणि बाईक रॅली काढल्याप्रकरणी ‘शिवजन्मोत्सव’ समितीचे अध्यक्ष सुनिल लोमटे यांच्यासह 16 जणांवर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात आज दिनांक 20 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मिरवणूक, बाईक रॅली न काढता केवळ त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंग ठेवून आयोजित करावा, असे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले होते.
मात्र, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला तिलांजली देत ‘शिवजन्मोत्सव’ समितीचे अध्यक्ष सुनिल लोमटे, सदस्य प्रविण देशमुख, दुष्यंत लोमटे, मेहंदीखान ईस्माईल खान पठाण, हसन मोहंमद चाऊस, मनोज कालीया, निखील सुंदरराव जगदाळे, प्रमोद सिद्राम पोखरकर, जयसिंग गोपिनाथ लोमटे, सय्यद अतहर सय्यद अजगर, संतोष सदाशिव काळे यांनी शहरातून बाईक रली आणि भव्य मिरवणूक काढली. तसेच, मोरेवाडी येथील स्वप्नील सुर्यकांत मोरे, प्रविण मोरे, निलेश श्रीकिशन मोरे, अक्षय मोरे आणि शिवराज नरवाडे यांनीही बाईक रॅली काढली होती.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे पो. ना. संतोष बदने यांच्या फिर्यादीवरून वरील 16 जणांवर आज अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक पी. बी. चाटे या करित आहेत.