अंबाजोगाई : राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत अंबाजोगाई तालुक्यातील 25 महिलांना प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश आज बुधवार दिनांक 16 फेब्रुवारीला तहसील कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.
नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा आदी कारणांमुळे घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबाला आर्थिक अडचणी येतात. या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी ज्या कुटुंबाचा कर्ता पुरुष गेला आहे, अशा विधवा महिलांना शासनातर्फे राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजनेतून 20 हजार रुपयांची मदत करण्यात येते.
अंबाजोगाई तालुक्यात 25 विधवा महिलांना नुकताच या मदतीचा धनादेश वाटप करण्यात आला. धनादेश वाटपाचा कार्यक्रम अंबाजोगाई तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण आणि तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांच्यासह गोविंदराव देशमुख, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुधाकर माले, दत्ता सरवदे, उज्जैन बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.