अनेक वर्षांची परंपरा असलेला ‘शिवजन्मोत्सव’ सोहळा यावर्षीही उत्साहात रंगणार
अंबाजोगाई : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यावर्षी मोठया उत्साहात साजरी करण्याचा निर्धार ‘शिवजन्मोत्सव’ समितीचे अध्यक्ष सुनिल लोमटे यांनी केला आहे. ‘शिवजन्मोत्सव’ निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे.
सुनिल लोमटे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून गेली अनेक वर्षांपासून ‘शिवजन्मोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मागच्या अनेक वर्षांची सांस्कृतिक परंपरा लाभलेला ‘शिवजन्मोत्सव’ यंदा शनिवार दिनांक 19 फेब्रुवारीला साजरा होत असून या दिवशी सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ध्वजारोहण, जिजाऊ वंदना, 8 : 30 वाजता वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयात चित्रकला स्पर्धा तसेच सकाळी 10 वाजता रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. यानंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातून भव्य अशी मोटार सायकल रॅलीचे आयोजन देखील जयंतीनिमित्त करण्यात आले आहे.
सायंकाळी 4 वाजता शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातूनच भव्य असा ऐतिहासिक मिरवणूक सोहळा देखील पार पडणार आहे, अशी माहिती ‘शिवजन्मोत्सव’ समितीचे अध्यक्ष सुनिल लोमटे यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी कराव्यात, असे आवाहन देखील सुनिल लोमटे यांनी केले आहे.