अपर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन
अंबाजोगाई : शहरातील वाहतूक समस्येसह आदी प्रश्नांवर अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांनी बोलवलेल्या बैठकीत उपस्थित विविध कार्यालयाच्या प्रतिनिधींना खडे बोल सूनवत या समस्या सोडविण्यासाठी आपआपली यंत्रणा सक्षम करण्याच्या मार्गदर्शक सूचना मिसकर यांनी केल्या.
अंबाजोगाई शहरातील अतिक्रमणे, वाहतूक समस्या, वाढत्या चोऱ्या, नगर परिषदेच्या कृपेने शहरात विद्रुपीकरण करणारे डिजिटल बोर्ड या संदर्भात नागरिकांतून मोठ्या प्रमाणावर ओरड होत असल्याने यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांनी दिनांक 15 फेब्रुवारीला विशेष बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीस पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गव्हाणे, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे शुभम तांगडे, वीज वितरण कंपनीचे संजय देशपांडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, नगरअभियंता लहाने, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शेळके, सहाय्यक अभियंता विनोद गुरव, अंबाजोगाई आगाराचे आगारप्रमुख नवनाथ चौरे, महसूल विभागाचे नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड, अव्वल कारकून महेश राडीकर, विलास तपसे, रोटरी क्लबचे डॉ. निशिकांत पाचेगावकर, स्वप्नील परदेशी, मोईन शेख, पत्रकार दत्तात्रय अंबेकर, अ. र. पटेल, ॲड. संतोष लोमटे यांच्यासह आदी उपस्थित होते.
यावेळी बैठकीमधील विषय व चर्चेतुन समोर आलेल्या मुद्यानुसार नगर परिषद तर्फे शहरात कुठेही सीसीटिव्ही बसवलेले नाहीत, शहरात जे रोटरी क्लबच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावरकर चौक, सदर बाजार चौक या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत, ते सर्व सुरळीत सुरू करण्यात आले आहेत. शिवाय लवकरच शहरातील गुन्हेगारी, चोऱ्या यावर प्रतिबंद बसावा, यासाठी पोलीस विभागांतर्गत शहरातील 42 ठिकाणी 132 कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव असुन या सर्व कॅमेराचे कनेक्शन शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याला जोडण्यात येणार आहे, त्यासाठी कंत्राट देण्यात आलेले आहे.
शहरातील वाहतूक समस्या सुरळीत करण्यासाठी नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग यांच्या मालकीच्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्या संदर्भात ज्या त्या विभागाने लवकरात लवकर नियोजन करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. आज घडीस पोलीस यंत्रणेने उपलब्ध मनुष्य बळाचा वापर करून वाहतूक समस्या कशी दूर करता येईल, सम – विषम तारखेनुसार पार्किंग व्यवस्था कशी करता येईल, याचे नियोजन करण्यात यावे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानेही जड वाहने, राखेच्या गाड्या यावर फोकस करून आठ दिवसांतून एक वेळ याचे नियोजन करावे व वेळप्रसंगी दंडात्मक कार्यवाही करावी, या संदर्भात सूचना देण्यात आल्या.
यावेळी वाहतूक समस्येमध्ये अडथळे निर्माण करणारे विजेचे खांब वीज वितरण कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर काढून घ्यावेत, अशाही सूचना देण्यात आल्या. याच मुद्याशी निगडित शहरातील डिजिटल बोर्ड यावर नगर परिषदेने आपला अंकुश ठेऊन दंडात्मक कार्यवाही करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
अंबाजोगाई बसस्थानकामधील स्वच्छतागृह व स्वच्छतेविषयी असलेल्या तक्रारी विषयी उत्तर देताना आगार प्रमुख चौरे यांनी दिड महिन्यात बसस्थानकाचे काम पूर्ण होईल व त्यानंतर सर्व सुरळीत होईल, तरीही परिसर अधिकाधिक स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना करता येतील, असे आश्वासन दिले.