सामाजिक न्याय विभागाकडून 1 कोटी 19 लाख रुपये निधी उपलब्ध
मुंबई : बीड येथे सामाजिक न्याय भवनाची नवीन इमारत होणार असून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून यासाठी तातडीने सामाजिक न्याय विभागाकडून 1 कोटी 19 लाख 70 हजार रुपये निधी मंजूर करून वितरित करण्यात आला आहे.
बीड येथील सामाजिक न्याय भवनमध्ये समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, सुनावणी कक्ष, जात पडताळणी तसेच विभागांतर्गत विविध महामंडळाची कार्यालये एकाच इमारतीमध्ये आहेत. त्यामुळे प्रशस्त नवीन इमारत उभारणी करण्याचा ना. मुंडे यांचा मानस होता.
त्यानुसार ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सदर निधी उपलब्ध करून दिला असून, लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.
सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी स्वीकारल्यापासून धनंजय मुंडे यांनी या खात्याच्या माध्यमातून अनेक विकासकामे बीड जिल्ह्यात आणली आहेत. आपल्या बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ सुरू करून नोंदणी करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे.
त्याचबरोबर बर्दापूर ता. अंबाजोगाई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधी, परळी शहरातील भीमनगर येथे बुद्धविहार उभारणी साठी 15 कोटी रुपये यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात निधी उपलब्ध करून दिला आहे.