अंबाजोगाईतील कंपनी बागेत घडली घटना
अंबाजोगाई : ‘स्वाराती’ रुग्णालयाच्या रोडवर असलेल्या कंपनी बागेतील विहीरीत बुडून दोन सख्खया बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज दिनांक 4 फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास उघडकीस आली असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. सानिया अल्ताफ शेख (वय 18) आणि निदा अल्ताफ शेख (वय 16) अशी मुलींची नावे असून दोन्ही शहरांतील फ्लॉवर्स क्वार्टर परिसरात राहत होत्या.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, शहरातील फ्लॉवर्स क्वार्टर परिसरात निदा आणि सानिया या दोघी बहिणी आई – वडिलांसोबत राहत होत्या. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. वडील अल्ताफ हे फिरून भांडेविक्रीचा व्यवसाय करतात तर त्यांची पत्नी धुणीभांडी करते. सानिया ही मुकुंदराज महाविद्यालयात इयत्ता 12 वी च्या वर्गात शिक्षण घेत होती तर निदा ही 10 वी मध्ये शिकत होती.
शुक्रवारी सकाळी अल्ताफ यांनी निदा आणि सानियाला त्यांच्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मोरेवाडीला सोडले होते. दुपारी त्या दोघी तिथून परत येत असताना त्या कंपनी बागेतील विहिरीत बुडाल्या. विहिरीबाहेर त्यांची पर्स पडलेली दिसून आल्याने एका युवकाने विहिरीत डोकावून पहिले असता त्याला दोघींचे मृतदेह तरंगताना आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने दोघींचे मृतदेह विहिरीबाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी ‘स्वाराती’ रुग्णालयात पाठवून दिले. दरम्यान, दोन्ही बहिणी विहिरीत पडल्या की त्यांनी आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र या घटनेमुळे अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त होत आहे.