रुग्णालय प्रशासनाला दिले निवेदन
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी, अस्थायी प्राध्यपकांनी आज दिनांक 4 फेब्रुवारीला सामूहिक रजा आंदोलन केले. मुंबई येथील जे. जे. रुग्णालयाच्या समोर अस्थायी प्राध्यापकांचे विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन चालू आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने आंदोलकांशी चर्चा न करता अपमानास्पद वागणूक दिली असल्याचा आरोप अंबाजोगाई येथील सामूहिक रजा आंदोलनात सहभागी झालेल्या प्राध्यापकांनी केला आहे. रुग्णालय परिसरात एकत्र येऊन सर्व प्राध्यापकांनी घोषणाबाजी केली व रुग्णालय प्रशासनाला निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव विजय सौरभ यांच्यात गुरुवारी मंत्रालयात जोरदार खडाजंगी उडाली होती. याच्या निषेधार्थ आज स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक सामूहिक रजेवर गेले आहेत. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे डॉ. सचिन मुळकूटकर यांच्या नेतृत्वाखाली अस्थायी प्राध्यापकांचे शिष्टमंडळ विभागाचे सचिव सौरभ विजय यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयातील त्यांच्या दालनात पोहोचले. मात्र, भेटीची वेळ देऊनही ऐनवेळी ताटकळत ठेवण्यात आले आणि भेट नाकारली. किमान निवेदन स्वीकारण्याचे आणि नीट बोलण्याचे सौजन्य दाखवावे. डॉक्टरांशी असे वर्तन खपवून घेणार नसल्याची भूमिका प्राध्यापकांनी घेतली.
यावेळी निलंबित करण्याच्या सौरभ विजय यांच्या वक्तव्यावर आक्रमक झालेल्या डॉक्टरांनी सर्वांना निलंबित करावे लागेल, त्या आधी आम्ही सगळेच राजीनामा देतो, अशी भूमिका घेतली. सचिवांनी संघटनेच्या सदस्यांना अपमानित करून अशासकीय भाषेचा वापर केला, तसेच कोरोना योद्धा म्हणून शासनाने गौरव केलेल्या डॉक्टरांना बडतर्फ करण्याची धमकी दिली. या वागणुकीचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे संघटनेने म्हटले आहे.
अंबाजोगाई येथील आंदोलनात वैद्यकीय शिक्षक संघटनेचे डॉ. विश्वजित पवार, डॉ.राजेंद्र अंकुशे, डॉ. लामतुरे, डॉ. देवानंद पवार, डॉ. प्रसाद सुळे, डॉ. प्रवीण गोवंदे, डॉ. नामदेव जुने, डॉ. गणेश सुरवसे, डॉ. राहुल झिने, डॉ. सुनील स्वामी, डॉ. निलेकर एस. आर., डॉ. मंगल चौरे, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. राजश्री ढवळे, डॉ. सीमा मोहिते, डॉ. स्वाती चौधरी, डॉ. गणेश खंदारकर, डॉ. बिशेष मिहिकचुरे, डॉ. दीपाली देव, डॉ. व्ही. एल. वेदपाठक, डॉ. विनय नाळपे, डॉ. सतिशकुमार पोरवाल, डॉ. पी. एम. हिप्परगेकर, डॉ. मांगरेकर, डॉ. ज्योती डावळे, डॉ. शिवकांता मुंडे, डॉ. वृषाली राजगिरे, डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्यासह अनेक प्राध्यापक, डॉक्टरांनी सहभाग घेऊन स्वाक्षरी असलेले निवेदन प्रशासनाला दिले.