ठरलं ! दहावी – बारावी : नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन होणार परीक्षा

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने केले स्पष्ट

पुणे : राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. त्यामुळे दहावीची परिक्षा 15 मार्चपासून सुरु होणार असून 4 एप्रिलला संपणार आहे तर बारावीची परिक्षा 4 मार्च ते 30 पर्यंत सुरू राहणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एसएससी आणि एचएससी परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. तेव्हापासून परिक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तीन दिवसांपूर्वी तर विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्याच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर आज राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.

‘झिग झॅक’ पध्दतीने घेण्यात येणार परीक्षा

शिक्षण मंडळाने ऑफलाईन परीक्षांची पूर्ण तयारी केली आहे. यासाठी पावणे दोन लाख कर्मचारी झटत आहेत. कोरोना मार्गदर्शन सुचनांचे पालन करुन आवश्यक काळजी घेतली जात असून ‘झिग झॅक’ पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. जेथे शाळा तेथेच परीक्षा होणार आहे. तसेच पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच परिक्षा होणार आहेत. त्यामुळे दहावीची परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरू होणार आहे आणि 4 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

लाॅकडाऊनमुळे विद्यार्थी दोन वर्षे ऑनलाइन पध्दतीने शिक्षण घेत होते. त्यामुळे त्यांची लिहण्याची सवय कमी झाली आहे. त्यामुळे यंदा परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ दिल्यामुळे परीक्षा 11 ऐवजी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. त्याआधी दहा मिनिटे म्हणजे 10:20 वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात येईल. 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त 15 मिनिटे आणि 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त 30 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे.