टीम AM : मराठी चित्रपट सृष्टीतील राजबिंडा नट म्हणून ओळख असलेले रमेश देव यांचा आज जन्मदिवस. रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1929 ला अमरावती येथे झाला. रमेश देव यांचं आडनाव खरे तर ठाकूर, यांचं बालपण कोल्हापुरात गेले. राजर्षी शाहू महाराजांमुळे त्यांचं आडनाव देव झालं.
रमेश देव यांचे वडील त्या काळचे प्रसिद्ध फौजदारी वकील होते. शाहू महाराजांनी दिलेल्या स्कॉलरशिपवरच ते वकील झाले होते. एकदा एका कामात त्यांनी महाराजांना मदत केली तेव्हा महाराज म्हणाले, ‘ठाकूर, तुम्ही देवासारखे भेटलात. तुम्ही आता ठाकूर नाही – देवच !’ आणि तेव्हापासून या परिवाराचे देव हेच आडनाव झालं. पु. ल. देशपांडे यांनी एका चित्रपटातील भूमिका नाकारली म्हणून रमेश देव यांना चित्रपटात संधी मिळाली. आपली आई, गुरू राजा परांजपे आणि पत्नी सीमा यांच्यामुळेच ‘रमेश देव’ ही वेगळी ओळख निर्माण झाली.
रमेश देव हे दिसायला राजबिंडा होते. त्या काळात त्यांच्या देखणेपणावर अनेक मुली फिदा असायच्या. 1951 साली ‘पाटलाची पोर’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. राजा परांजपे दिग्दर्शित ‘आंधळा मारतो एक डोळा’ या 1956 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे त्यांना ओळख मिळाली होती. राजश्री प्रॉडक्शनचा ‘आरती’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. 1957 च्या सुमारास रमेश देव व सीमा (सराफ) या दोघांचीही रूपेरी कारकीर्द सुरू झाली. ‘आलिया भोगाशी’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची सीमा यांच्याशी पहिली भेट झाली आणि त्यानंतर सहा वर्षांनी एक जुलै 1963 ला त्यांचा विवाह झाला.
रमेश देव आणि सीमा देव यांची ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन केमिस्ट्री कायमच चांगली राहिली होती. रमेश देवांचे मराठी चित्रपटसृष्टीत फार मोठे योगदान आहे. एक काळ तर असा होता की, रमेश देव आणि त्यांची पत्नी सीमा देव चित्रपटात असतील तर तो हीट होणार अशी खात्री असायची. इंडस्ट्रीत वेळ पाळणारा नट म्हणूनच रमेश देव यांचं नाव घेतलं जात असे. रमेश देव यांनी अनेक चित्रपटात नायकाच्या भूमिका केल्या, पण ते उठून दिसले ते खलनायकी भूमिकेत. ‘भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच होता. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो, ही संकल्पनाच नव्हती.
रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले. तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या. रमेश देव यांनी निर्माता, दिग्दर्शक अशा विविध प्रांतातही ठसा उमटवला. त्यांचा ‘सर्जा’ हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट चांगलाच गाजला. अनेक हिंदी चित्रपटातही त्यांनी उत्तमोत्तम भूमिका केल्या.
ऋषीकेश मुखर्जींच्या ‘आनंद’ चित्रपटात राजेश खन्नाचा डॉक्टर मित्र खरोखरीच मनापासून रंगवला. त्यांच्या या भूमिकेला दादही मिळाली. अभिनेता म्हणून प्रस्थापित होवून रमेश देव यांनी एकाहून एक सरस चित्रपट दिले व आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळविले.
संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी तर रमेश देव यांना ‘कोल्हापुरी’ म्हणूनच ओळखत असे. रमेश देव यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत 285 हून अधिक हिंदी चित्रपट, 190 मराठी चित्रपट आणि 30 मराठी नाटकांमध्ये 200 हून अधिक शो केले. त्यांनी फीचर फिल्म्स, टेलिव्हिजन मालिका आणि 250 हून अधिक जाहिरात चित्रपटांची निर्मिती देखील केली. त्यांनी अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शन मालिका देखील दिग्दर्शित केल्या. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. रमेश देव यांचे चिरंजीव अजिंक्य देव अभिनेता व दिग्दर्शक आहेत तर दुसरे चिरंजीव अभिनव हा दिग्दर्शक आहे. रमेश देव यांना अभिवादन.
शब्दांकन : संजीव वेलणकर