पद्मश्री शंकरबापू आपेगावकर सांगितीक गौरव पुरस्कार पं. पुष्पराज कोष्टी यांना प्रदान

अंबाजोगाई : तपस्वी पखवाज साधक पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना सांगितिक मानवंदना देण्यात आली. या निमित्त शहरातील हॉटेल ‘ईट ॲन्ड स्टे’ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पद्मश्री शंकरबापू सांगीतिक गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

शनिवार, दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक जयप्रकाश दगडे, हभप लक्ष्मण महाराज मेंगडे, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉ. नंदकिशोर सोमवंशी, पंडित उध्दवबापू आपेगावकर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रख्यात डागर घराण्याचे सुरबहार वादक पं. पुष्पराज कोष्टी (मुंबई) यांना पद्मश्री शंकरबापू सांगितीक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप 15 हजार रूपये रोख रक्कम, मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. तसेच पद्मश्री शंकरबापू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपेगावकर कुटुंबाच्या वतीने बंकटस्वामी संस्थान आळंदी (पंढरपूर), नेकनुर यांना 50 हजार रूपये देणगीही देण्यात आली.

सुरबहार वादन संगीत सभेने श्रोते मंत्रमुग्ध 

पुष्पराज कोष्टी व त्यांचे सुपुत्र भूषण कोष्टी या पिता – पुत्रांची सुरबहार वादन संगीत सभा यावेळी संपन्न झाली. त्यांना पखवाज संगत उद्धव आपेगावकर यांनी केली. या संगीत सभेची सुरूवात राग पटदिपने झाली. ‘पटदीप’ हा संध्याकाळचा राग आहे. ध्यान धारणेच्या अंगाने जाणारा अभ्यासू राग आहे. आलाप, जोड या माध्यमातून बंदीश चौताल यामध्ये वाजविली. पं. उध्दवबापू यांनी पखवाजाची तोलामोलाची साथसंगत केली. कारण, रूद्रविणा, सुरबहारच्या साथीला फक्त पखवाज असते. यात पंडितजींनी वेगवेगळ्या प्रकारे तालाचा उपज अंगाने वादन केले आणि तितक्याच समर्थपणे सुरबहार व पखवाज यांच्या सुसंवादाने रसिकांना खिळवून ठेवले.

सुरबहारचा स्वर आणि पखवाजचा धीरगंभीर नाद यातून उपस्थितांना नादब्रह्माची अनुभूती आली. संगीत सभेचा समारोप सुलतालाने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ केंद्रे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पंडित उद्धवबापू आपेगावकर यांनी मानले. कार्यक्रमास संगीतप्रेमी रसिक, श्रोते उपस्थित होते.