मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बारावीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील. अद्याप या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. पण परीक्षा सुरू होण्याआधी कोरोना संकटाचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल. परिस्थिती नियंत्रणात असल्यास परीक्षा ठरल्याप्रमाणेच ऑफलाइन पद्धतीने होतील, असे महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
कोरोना संकट नियंत्रणात असल्यामुळे राज्यातील बालवाड्या, पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा कनिष्ठ महाविद्यालये तसेच पदवी आणि पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठीची महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरू आहेत. पण काही भागांमध्ये कोरोना संकटाची तीव्रता अद्याप जास्त असल्यामुळे तिथल्या शिक्षणसंस्था अद्याप सुरू झालेल्या नाही. यामुळे परीक्षा नेमक्या कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षांबाबत महत्त्वाची माहिती दिली. महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत आढावा घेऊ, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
कोरोना संकटाची तीव्रता जास्त असल्यामुळे महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यांमध्ये अद्याप शिक्षणसंस्था सुरू झालेल्या नाही. कोरोना संकटाची तीव्रता नियंत्रणात आली तर शिक्षणसंस्था सुरू होतील. शिक्षणसंस्थांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे विद्यार्थ्यांना मास्क घालण्याचे बंधन लागू असेल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
भारतात 15 आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांचे तसेच नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. यामुळे पात्र व्यक्तींनी नियमानुसार लस टोचून घ्यावी; असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले. मुलांना सध्या शाळेत येण्याची सक्ती केलेली नाही. पालकांचे लेखी संमतीपत्र सोबत आणणाऱ्या मुलांनाच शिक्षणसंस्थेत प्रवेश दिला जात आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.