ओमायक्रॉन : सर्दी – खोकल्याला सहजतेने घेवू नका, स्वतःची काळजी घ्या – डॉ. बिराजदार

अंबाजोगाई : बदलत्या वातावरणामुळे होणाऱ्या सर्दी आणि खोकल्याला सहजतेने घेवू नका, स्वतःची काळजी घ्या व कुटुंब सुरक्षित ठेवा, असा सल्ला ‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी दिला आहे.    

गेली आठ – दहा दिवसांपासून प्रत्येक घराघरात सर्दी – खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असून या सर्दी खोकल्याला सहजतेने घेवू नका, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडुन नका, नजीकच्या फिजिशीयनचा सल्ला घेवून औषधी घ्या, डबल मास्क, वारंवार सॅनिटायझरचा वापर करा, स्वतःला होम क्वारंटाईन करुन आराम करा, दररोज दोन वेळा व्हिक्स टाकुन वाफ घ्या, मिठाच्या पाण्याने गुळण्या करा, असा सल्ला डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी दिला आहे.      

या संदर्भात बोलताना डॉ. सिध्देश्वर बिराजदार पुढे म्हणाले की, सर्दी, खोकला आणि सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही ते सहजतेने घेवू नका, कारण ते ओमायक्रॉनचे लक्षण देखील असू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही डॉक्टरांकडे जावून तपासणी करावी. तसेच कोरोनाची चाचणी करावी. रिपोर्ट येईपर्यंत घरात देखील मास्क लावून वावरावे. यासोबतच घरातील लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या व्हेरियंटमध्ये सौम्य ताप हे एक सामान्य लक्षण होते. त्याच वेळी, काही लोकांनी ओमायक्रॉन दरम्यान देखील तापाची तक्रार केली आहे. त्यामुळे, तुम्हालाही अनेक दिवस तापाची तक्रार असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच कोरोनाची चाचणी करून घ्या.    

कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटची लक्षणे बदलत चालली असून सर्दी, खोकला, डोके दुखणे, डोळे दुखणे किंवा सूज येणे, जळजळ होणे आणि डोळ्यांतून पाणी येणे, अशी कोणतीही समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.    

कोरोना व्हायरस किंवा ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी, स्वच्छतेची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासोबतच नेहमी मास्क लावावा आणि वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावे. याशिवाय, जर तुम्ही लस घेतली नसेल तर लगेच लस घ्या. लसीकरणाने तुम्ही स्वतःला संसर्ग होण्यापासून वाचवू शकता, असाही सल्ला डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी दिला आहे.