मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमुचे अभिनंदन
महाराष्ट्र एनसीसीने पटकावला पंतप्रधान ध्वजाचा सर्वोच्च सन्मान
मुंबई : ‘…महाराष्ट्राच्या जिद्द आणि चिकाटीचा झेंडा दिल्लीत फडकवलात..छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा वारसा सांगणारी कामगिरी बजावलीत…शाब्बास..भले बहाद्दर…’ अशी शाबासकी देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर्स बॅनर) पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमुचे अभिनंदन केले आहे.
राष्ट्रीय छात्रसेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाने देशातील सर्वोत्कृष्ट संचालनालयाचे पारितोषिक पटकावले आहे, त्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र संचालनालयाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत महाराष्ट्र छात्रसेनेच्या चमुला हा ध्वज प्रदान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र संचालनालय आणि कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील ही देशातील सर्वोत्तम छात्रसैनिक ठरली आहे. या यशासाठी पृथ्वी हिचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. तसेच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर बॅनर) चा वाहक सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधव, सर्वोत्कृष्ट संचालनालयासाठीचा पारितोषिक स्वीकारण्याचा मान मिळालेले महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, कॅप्टन निकिता खोत यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.