अंबाजोगाई : दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडताच बँकेचे संस्थापक माजी अध्यक्ष राजाभाऊ धाट यांनी नाराजी दर्शवित आज दिनांक 28 जानेवारी शुक्रवारी बँकेसमोर प्रतिकात्मक उपोषण केले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी निवडणुकीत दिलेला शब्द पाळला नाही, याचा निषेध करत धाट यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला.
‘विश्वास, विकास आणि विनम्रता’ या त्रिसुत्रीने आर्थिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेची उभारणी माजी प्राचार्य राजाभाऊ धाट यांचा नेतृत्वाखाली झाली. दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या विकासात धाट यांचे मोठे योगदान आहे. दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजाभाऊ धाट यांना माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बँकेचे अध्यक्ष करण्याचा शब्द दिला होता.
गुरुवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड झाली. या निवडीत पंकजा मुंडे यांनी दिलेला शब्द पाळला नाही. याचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी राजाभाऊ धाट यांनी दीनदयाळ बँकेच्या मुख्यालयासमोर प्रतिकात्मक उपोषण केले. दरम्यान राजाभाऊ धाट यांच्या उपोषणास शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व बँकेच्या सभासदांनी भेट देत पाठिंबा दर्शविला आहे.