अंबाजोगाई : तपस्वी पखवाज साधक पद्मश्री शंकरबापू आपेगावकर सांगितीक गौरव पुरस्कार पं. पुष्पराज कोष्टी यांना जाहीर झाला असून दिनांक 29 जानेवारीला शनिवारी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे संयोजकांनी दिली आहे.
तपस्वी पखवाज साधक पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांना सांगीतिक मानवंदना देण्याच्या निमित्ताने हॉटेल ‘ईट अन्ड स्टे’ येथे दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता पद्मश्री शंकर बापू सांगीतिक गौरव पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
प्रख्यात डागर घराण्याचे सुरबहार वादक पं. पुष्पराज कोष्टी (मुंबई) यांना सदरिल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप 15000 रोख रक्कम, मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. तसेच पद्मश्री शंकरबापू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बंकटस्वामी संस्थान आळंदी, पंढरपूर, नेकनुर यांना 50 हजार रुपये देणगीही देण्यात येणार आहे. यावेळी पुष्पराज कोष्टी व त्यांचे सुपुत्र भूषण कोष्टी या पिता – पुत्रांचा युगल सूरबहार वादन कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास पखवाज संगत प. उद्धव आपेगावकर हे करणार आहेत. ज्यांनी कोविड लसीकरणाचे दोन डोस घेतलेले आहेत, अशांनाच प्रवेश दिला जाईल. या कार्यक्रमाचा संगीतप्रेमी रसिकांनी शासन नियमांचे पालन करून लाभ घ्यावा, असे आवाहन पद्मश्री शंकरबापू आपेगावकर परिवार, अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात येत आहे.