दीनदयाळ बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. मकरंद पत्की तर उपाध्यक्षपदी ॲड. राजेश्वर देशमुख यांची निवड

बँकेचे संस्थापक माजी अध्यक्ष राजाभाऊ धाट यांचे उद्या उपोषण

अंबाजोगाई ‍: ‘विश्वास, विकास आणि विनम्रता’ या त्रिसुत्रीने आर्थिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. मकरंद माधवराव पत्की तर उपाध्यक्षपदी ॲड.  राजेश्र्वर वसंतराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.‌ दरम्यान या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असतानाच बँकेचे संस्थापक माजी अध्यक्ष राजाभाऊ धाट यांनी नाराजी दर्शवित संचालक पदाचा राजीनामा देत उद्या दिनांक 28 जानेवारीला बँकेसमोर प्रतिकात्मक उपोषण करणार आहेत.

पंचवार्षिक निवडणुकीत अंबाजोगाई येथील दीनदयाळ नागरी सहकारी बँक पुन्हा एकदा माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याच हाती कायम राहिली आहे. दीनदयाळ पॅनलचे उमेदवार बहुमतांनी विजयी झाले आहेत. 15 जागांकरिता नुकतीच ही निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. दरम्यान, पंकजाताई मुंडे यांच्यासह माजी अध्यक्षा शरयूताई हेबाळकर, प्राचार्य किशन पवार, प्रा. जयकरण कांबळे हे 4 उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले होते.

निवडणुकीत माजी प्राचार्य राजाभाऊ धाट, विजयकुमार कोपले, बिपिन क्षीरसागर, ॲड. मकरंद पत्की, ॲड. राजेश्वर देशमुख, चैनसुख जाजू, राजाभाऊ दहिवाळ, विवेक दंडे, प्रा. अशोक लोमटे, मकरंद कुलकर्णी सोनेसांगवीकर, बाळासाहेब देशपांडे हे मोठे मताधिक्य मिळवून संचालक म्हणून निवडून आले आहेत. 

माजी मंत्री व बँकेच्या मार्गदर्शक पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यासी अधिकारी व्हि. एस. पोतंगले यांच्या अध्यक्षतेखाली दीनदयाळ भवन, परळी रोड, अंबाजोगाई येथे गुरूवार, दिनांक 26 जानेवारीला सकाळी 11 वाजता नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदांसाठी निवड प्रक्रिया पार पडली. यात बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. मकरंद पत्की आणि उपाध्यक्षपदी ॲड. राजेश्वर देशमुख यांची अधिकृत निवड करण्यात येत असल्याची यावेळेस घोषणा करण्यात आली. या बैठकीचे सुत्रसंचालन करून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संस्थापक माजी अध्यक्ष राजाभाऊ धाट यांचे उद्या उपोषण

दीनदयाळ नागरी सहकारी बँकचे संस्थापक माजी अध्यक्ष राजाभाऊ धाट यांनी बँकेच्या निवड प्रक्रियेबद्दल नाराजी व्यक्त करत संचालक पदाचा राजीनामा दिला असून राजकारण्यांनी दिलेला शब्द ‌पाळला नसल्याने उद्या दिनांक 28 जानेवारीला बँकेच्या समोर ‌प्रतिकात्मक उपोषण करणार आहेत.