‘आय‌ लव‌ अंबाजोगाई’ : महापुरुषांच्या चौकांची दयनीय अवस्था

लोकप्रतिनिधी, नगर परिषदेचे दुर्लक्ष

अंबाजोगाई : अंबाजोगाईत दोन प्रमुख चौकात ‌‌‌‌’आय लव‌ अंबाजोगाई’ च्या‌ लाईट फ्रेम दोन मित्रमंडळाच्या वतीने बसविण्यात आल्यातरी शहरातील महापुरुषांच्या चौकांची मात्र दयनीय अवस्था झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधी, नगरपरिषदेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. या चौकांचेही सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.

अंबाजोगाई शहर हे सांस्कृतिक, अध्यात्मिक, शैक्षणिक आणि चळवळीचं मराठवाड्यातील प्रमुख केंद्र आहे. त्यामुळें या शहरात देवदर्शन, पर्यटन, साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बाहेरुन येणाऱ्यांचा राबता मोठ्या प्रमाणावर असतो. गावाची‌ ओळख गावातील रस्ते आणि महापुरुषांच्या चौकांवर‌ बऱ्यापैकी अवलंबून असते. याच उदात्त हेतूने शहरातील संत भगवानबाबा चौकात आणि यशवंतराव चव्हाण चौकात ‘आय‌ लव‌ अंबाजोगाई’ च्या लाईटफ्रेम बसविण्यात आल्या. परंतू शहरातील काही महापुरुषांच्या चौकांची अवस्था दयनीय झाली असून हे चौक सुशोभिकरणापासून ‘वंचित’ राहिले आहेत. केवळ जयंती आणि पुण्यतिथीदिनी या चौकांचा उपयोग महापुरुषांच्या पाटीला हार अर्पन करण्यासाठी केला जातो.

शहरातील मेडिकल परिसरातील आरक्षणाचे जनक लोकराजे शाहु महाराजांच्या चौकाकडे पाहिल्यानंतर हा चौक बरेच‌ काही सांगून जातो. चौकाचे बांधकाम मोडकळीस आले असून बऱ्याच ठिकाणी विटा निघून पडलेल्या आहेत. मेेेडिकल परिसरातील मित्रमंंडळाच्या वतीने लोकसहभागातूून या चौकाची उभारणी करण्यात आली होती. त्यालाही बऱ्याच वर्षांंचा कालावधी झाला आहे. तशीच अवस्था रिंगरोडकडील‌ तथागत चौकाची झाली आहे. गाड्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ या रोडवर असल्याने याही चौकाचे‌ बांधकाम मोडकळीस येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, नगर परिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष देवून या चौकांच्या सुशोभीकरणाचे‌ काम लवकर हाती घ्यावे, अशी मागणी पुरोगामी जनतेतून होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे बांधकामही लोकसहभागातून

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकाचे ‌‌‌‌‌‌बांधकामही भीम अनुयायांनी लोकसहभागातून केले आहे. परळीवेस मधील भीमनगर येथील बोरोडे यांनी यात महत्त्वाचा सहभाग घेतला आहे. अंबाजोगाई शहरातील महापुरुषांच्या चौकांचे देखण्या स्वरुपात सुशोभीकरण करण्यासाठी ‌‌एक मास्टर प्लॅन तयार करून अत्यंत दर्जेदार स्वरुपाचे चौकांचे सुशोभीकरण करण्यात यावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.