टीम AM : बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री. मिनाक्षी शेषाद्रींचा जन्म 16 नोव्हेंबर 1963 ला झारखंड येथे झाला. शशिकला शेषाद्री ऊर्फ मीनाक्षी शेषाद्री यांनी हिंदी व तमिळ चित्रपटांमधून अभिनय केला आहे. मीनाक्षी शेषाद्री यांनी वयाच्या 17 व्या वर्षी 1981 सालचा ‘मिस इंडिया’ किताब जिंकला होता. ‘मिस इंडिया’ किताब जिंकणारी ही सर्वांत तरूण होती. मीनाक्षी शेषाद्री यांनी 1982 साली ‘पेंटर बाबू’ या हिंदी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. 1983 च्या सुभाष घई – दिग्दर्शित ‘हीरो’ या चित्रपटाने त्यांना कीर्ती मिळवून दिली.
‘दामिनी’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. मीनाक्षी शेषाद्री एक सक्षम अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्कृष्ट डान्सरसुद्धा आहे. मीनाक्षी शेषाद्री यांनी बॉलिवूडमधील जवळपास प्रत्येक मोठ्या निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर काम केले आहे. अमिताभ बच्चनपासून ते विनोद खन्ना, ऋषी कपूर, अनिल कपूर या बड्या स्टार्सबरोबर मीनाक्षी झळकल्या आहेत.
‘जुर्म’ आणि ‘दामिनी’ या सिनेमांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअरचे नामांकन मिळाले होते. मिनाक्षी शेषाद्री आता सिनेमाच्या या ग्लॅमर दुनियेपासून खूप दूर झाल्या आहेत. ‘घातक’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता. मीनाक्षी या व्यवसायाने बँकर असलेल्या हरीश मैसूरबरोबर विवाहबद्ध झाल्या. लग्नानंतर त्या आपल्या पती आणि कुटुंबीयांबरोबर अमेरिकेतील टेक्सास शहरात स्थायिक झाल्या आहेत. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे नाव केंद्रा तर मुलाचे नाव जोश आहे.
अभिनेत्रीसोबत मिनाक्षी एक उत्कृष्ट क्लासिकल डान्सरसुद्धा आहेत. चार नृत्यप्रकारात त्या पारंगत आहेत. भरतनाट्यम, कुचिपुडी, कथ्थक आणि ओडिसी नृत्य प्रकार त्या शिकल्या आहेत. त्यांनी वेम्पति चिन्ना सत्यम आणि जय रामाराव यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवले होते. मीनाक्षी यांनी फिल्म इंडस्ट्रीला जरी रामराम ठोकला असला तरीदेखील त्यांनी आपली नृत्याची आवड जोपासत ठेवली आहे.
टेक्सासमध्ये मीनाक्षी यांनी कथ्थक अकादमी उघडली असून तेथे त्या नृत्याचे धडे देतात. येथे मीनाक्षी स्वत: त्यांना भरतनाट्यम, कथक, कुचीपुडी आणि ओडिसीसारखे नृत्य शिकवतात. एका मुलाखतीत त्यांना विचारले गेले की, काय चित्रपट सृष्टीत करियर करण्यासाठी तू मुंबईमध्ये परतणार का ? तेव्हा ह्या प्रश्नावर उत्तर देताना मीनाक्षी यांनी सांगितले होते की, तिची मुले मोठी झाल्यावर ती ह्या गोष्टीवर विचार करू शकते. मीनाक्षी सोशिअल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतात. मिनाक्षी शेषाद्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
शब्दांकन : संजीव वेलणकर