विद्या सिन्हा : साडीला सौंदर्य बहाल करणारी‌ अभिनेत्री

टीम AM : निशिगंधांच्या फुलांचा सुगंध येताच आणि फुलदाणीत ठेवलेली निशिगंधाची लांबड्या दांडीची फुले पाहताच विद्या सिन्हाची आठवण कोणाला येणार नाही. मध्यमवर्गीय गृहिणीचे व्यक्तिमत्व, मोहक चेहरा, बुद्धीला साद घालणारा संयत अभिनय या तिच्या वैशिष्ट्यांसह ‘छोटीसी बात’ आणि ‘रजनीगंधा’ या केवळ दोन चित्रपटांनी तिला हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात स्थान दिले.

साडीला सौंदर्य बहाल करणारी भारतीय शरीरयष्टी, वेणीचे पाठीवर लोळणे आणि ‘अधिकार ये जबसे साजन का हर धडकन पर माना मैने’ ही भारतीय गृहिणीची भावना, विद्या सिन्हाच्या व्यक्तित्वात लगडली होती. या दोन्ही चित्रपटांनी अमोल पालेकर, विद्या सिन्हा यांना मध्यमवर्गियांचे प्रतिनिधी बनवले. मॉडेलिंग करणाऱ्या विद्या सिन्हाला दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांनी सिनेमात आणले आणि त्यांच्या या दोन चित्रपटांनीच तिची कारकीर्द घडवली. 

30 -32 फिल्म्स आणि काही टीव्ही सिरिअल्स एवढीच कारकीर्द तिची होती. ती कधीही मुख्य धारेतील नायिका नव्हती आणि तिने त्यासाठी फार प्रयत्नही केले नाहीत. याचे कारण बहुधा तिच्या खासगी आयुष्यातील घटनांमध्ये दडलेले असावे. चित्रपट सृष्टीत येण्याआधीच तिचा प्रेमविवाह झाला होता. पहिले दोन्ही यशस्वी चित्रपट वर्षभरात आले आणि विद्या सिन्हा चर्चेत आली. 

परंतु नंतर पतीचा आजार व इतर कारणांमुळे ती थोडी दूर फेकली गेली. पुढे पतीचा मृत्यू, दुसरा विवाह आणि घटस्फोटानंतर काही चित्रपट व मालिका असा तिचा प्रवास होता. पहिल्या यशानंतर ‘पती, पत्नी और वह’, ‘मुक्ती’, ‘कर्म’ असे चांगले चित्रपट तिच्या वाट्याला आलेही, परंतु ती कायमच स्मरणात राहील, ती दोनच चित्रपटांमुळे. त्या अर्थाने तिचे फिल्मी आयुष्यही ‘छोटी सी बात’ च ठरले. 

अभिनेत्री विद्या सिन्हा ‌: जन्म.15 नोव्हेंबर 1947 मुंबई. निधन.15 ऑगस्ट 2019.

शब्दांकन : संजीव वेलणकर