विद्यमान नगरसेवकांबद्दल बऱ्याच प्रभागात नाराजी
अंबाजोगाई : अंबाजोगाई नगर परिषदेची निवडणूक काही महिन्यांवर असली तरी शहरात निवडणुकीची चर्चा मात्र जोरात सुरु आहे. मला निवडून येऊन लोकांची कामे करायचीत. असं निवडणुकीदरम्यान बऱ्याच उमेदवारांकडून ऐकण्यास मिळतं. पण अंबाजोगाईत मात्र सध्या नवतरुण उमेदवार विद्यमान नगरसेवक, नगरसेविका यांच्या पाच वर्षाच्या कारभाराला कंटाळून नाराजी व्यक्त करत सांगत आहेत, मुझे चुनके आने का नही, पाडायचयं. ही परिस्थिती अंबाजोगाईतील बहुतांश प्रभागातील आहे.
नगरसेवक, नगरसेविका या शब्दातच सेवक असा शब्द आहे. वार्डातील, प्रभागातील नागरिकांना नगरपरिषदेच्या मुलभूत सुविधा मिळवून देणे. वार्डातील विकासकामांना निधी उपलब्ध करून घेऊन ती कामे दर्जेदार स्वरुपाची करुन घेणं, पाण्याची पाइपलाइन, दिवाबत्ती, स्वच्छता यासह विविध कामं करण्यासाठी सुजाण जनता अशा सेवकांना, सेविकांना पाच वर्ष जनतेची सेवा करण्यासाठी निवडून देऊन नगर परिषदेत पाठवते. परंतू नगरपरिषदेत निवडून गेल्यानंतर सेवकांचे लागलीच गुत्तेदार होतात.
मग सुरु होतो कामांचा खेळ. नगरसेवक जर आपल्या प्रभागातील कामाची गुत्तेदारी करत असेल तर ती कामे दर्जेदार कशी होणार ? कामाकडे दुर्लक्ष, कामाचा दर्जा या सगळ्या गोष्टींकडे साफ दुर्लक्ष होऊन कामं निकृष्ट दर्जाची होतात. नागरिकांना चांगले रस्ते, पाणी, रखडलेली विकासकामे या गोष्टींची पूर्तता या गुत्तेदारांकडून होत नाहीत.
त्यामुळे अशा नगरसेवक, नगरसेविकांबद्दल नाराजी वाढत जाते. याचा हिशोब नगर परिषदेच्या निवडणुकीत घेण्यासाठी काही जण तयार होतात. पैसे खर्च करायची तयारी ठेवून तरुण उमेदवारांकडून मगचं म्हणटले जाते, ‘मुझे चुनके आने का नहीं, पाडायचयं.’
उमेदवारी देताना नव्या चेहऱ्यांना संधी ?
अंबाजोगाई नगर परिषदेतील बहुतांश विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक यांनी गेल्या दोन-तीन टर्म मध्ये प्रमुख राजकीय पक्षांची उंबरे झिजवली आहेत. कधी या पक्षातून तर कधी त्या पक्षातून. कधी हा नेता तर कधी तो नेता, असं करत राजकीय वाटचाल केली आहे, अशा लोकप्रतिनिधींनाही सामान्य जनता कंटाळली असून प्रत्येक प्रभागात, वार्डात नवीन उमेदवारांना संधी द्यावी, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.
अंबाजोगाईत प्रमुख राजकीय पक्षांनी काही आजी – माजी नगरसेवकांच्या एकंदरीत कामाचा आलेख पाहून नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यास नक्कीच त्यांना यश मिळेल, असंही बोलल्या जात आहे तर दुसरीकडे काही वार्डात, प्रभागात नगरसेवकांनी, नगरसेविकांनी डोळ्यात भरण्यासारखी काहीच विकासकामे केली नसल्यामुळे अशा भागातील मतदार त्यांच्यावर नाराज झाले आहेत. या नाराजीचं मतात रुपांतर करण्यासाठी आणि पुन्हा असे कामं न करणारे लोकप्रतिनिधी नगरपरिषदेची पायरी चढू नये, यासाठी अनेक तरुण उमेदवार निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत.
नगर परिषदेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. वार्ड, प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेऊन सदस्य संंख्येत काही अंशी वाढ केली आहे. त्यामुळे सदस्य संख्या वाढणार असून नवीन उमेदवारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. अंबाजोगाई शहरात गेल्या काही दिवसांत बरेच राजकीय समीकरणे बदलली आहेत आणि बदलनारही आहेत. त्याचा थेट परिणाम या निवडणुकीत दिसून येणार आहे, हे मात्र निश्चित आहे.