टीम AM : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही. शांताराम यांचा जन्मदिन. त्यांचा जन्म.18 नोव्हेंबर 1901 ला कोल्हापूर येथे झाला. शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपट सृष्टीतलं सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेलं नाव. शांताराम बापू या नावानं सुद्धा ते ओळखले जात. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला खोल ठसा उमटवला. दिग्दर्शक म्हणून अनेक नवीन संकल्पना त्यांनी पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीत वापरल्या. जवळजवळ सहा दशकं ते चित्रपटसृष्टीत कार्यरत होते.
त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती कोल्हापुरातील बाबुराव पेंटर यांच्या मालकीच्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ पासून. कंपनीत पडेल ते काम करता करता 1921 साली निर्माण झालेल्या ‘सुरेखा हरण’ या मूकपटात छोटीशी भूमिका केली. 1925 साली निर्माण झालेल्या ‘सावकारी पाश’ या सामाजिक चित्रपटात त्यांनी एका तरुण शेतकऱ्याची भूमिका केली आणि 1927 साली त्यांनी ‘नेताजी पालकर’ हा पहिला मूकपट दिग्दर्शित केला.
बाबुराव पेंटर यांच्याकडे नऊ वर्षं नोकरी केल्यानंतर त्यांनी दामले, फत्तेलाल, धायबर आणि कुलकर्णी यांच्या भागीदारीत कोल्हापुरात ‘प्रभात फिल्म्स’ ची स्थापना केली. तेथे शांताराम बापूंना आपली कला विकसित करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळालं. ‘गोपाळ कृष्ण’, ‘राणी साहेबा’, ‘खुनी खंजर’, ‘उदयकाल’ असे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्यांनी दिले. ‘प्रभात’ चा पहिला मराठी बोलपट ‘अयोध्येचा राजा’ 1932 साली प्रदर्शित झाला.
1933 साली त्यांनी ‘सैरंध्री’ हा भारतातला पहिला रंगीत चित्रपट काढण्याचं धाडस केलं. पण चित्रपटाच्या प्रिंट्स नीट डेव्हलप न झाल्यामुळे हा प्रयत्न फसला. ‘प्रभात’ ला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. पण त्यातून डगमगून न जाता शांताराम यांनी ‘अमृतमंथन’ ची निर्मिती केली. हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला. त्यानंतरचा 1937 साली निर्मिलेला ‘संत तुकाराम’ हा बोलपट भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला.
भारतात विशेषत: महाराष्ट्रात हा चित्रपट धो-धो चालला. त्याची कीर्ती सातासमुद्रापार गेली. व्हेनीस चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात आला. जरठ विवाहावर टीका करणारा ‘कुंकू’ (दुनिया ना माने), वेश्येच्या पुनरुज्जीवनावर भाष्य करणारा ‘माणूस’ (आदमी) आणि हिंदू – मुस्लीम दंग्यांच्या पार्श्वभूमीवर मैत्रीचा संदेश देणारा शेजारी (पडोसी) हे सामाजिक चित्रपट अफाट गाजले.
शांताराम बापूंनी 1942 साली प्रभात फिल्म कंपनी सोडली. त्यांनी मुंबईत येऊन ‘राजकमल कला मंदिर’ या स्वत:च्या संस्थेची स्थापना केली. ‘राजकमल’ च्या माध्यमातूनही त्यांनी दर्जेदार चित्रपटांची मालिका सुरू ठेवली. ‘राजकमल’ ने 1946 साली डॉ. कोटणीसांच्या जीवनावर आधारीत ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’, 1951 सालचा होनाजी बाळांचा ‘अमर भूपाळी’, 1955 सालचा रंगीत ‘झनक झनक पायल बाजे’, 1957 चा 1959 चा ‘नवरंग’ हे चित्रपट विशेष उल्लेखनीय ठरले. ‘डॉ. कोटणीस’ आणि ‘दो आँखे’ या चित्रपटांमध्ये त्यांनी स्वत: नायकाची भूमिका केली होती. 1972 चा ‘पिंजरा’ या चित्रपटाने मराठी चित्रपटांच्या लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मागे टाकले. ‘पिंजरा’ मराठीतला पहिला संपूर्ण रंगीत चित्रपट होता.
शांताराम बापूंना चित्रपट माध्यमाची भाषा उत्तमपणे अवगत होती. हॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माता – निर्देशक – नट चार्ली चॅप्लीन यांनी शांताराम बापू यांच्या दिग्दर्शनाचं कौतुक केलं होतं. शांताराम बापूंना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. महाराष्ट्राचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या आचार्य प्र. के. अत्रेंनी शांताराम बापूंना ‘चित्रपती’ ही पदवी दिली. चित्रपट माध्यमातील व्यक्तींना दिला जाणारा भारतातला सर्वोच्य पुरस्कार ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ 1985 साली शांताराम बापूंना प्रदान करण्यात आला, तर 1992 साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानीत केले.
चित्रपटासाठीच्या विषयाची निवड, त्याचा आशय, कॅमेरा तंत्र, संकलन या सर्व बाबतीत बापूंचे चित्रपट काळाच्या पुढे असत. चित्रपट हे कलेचं आणि मनोरंजनाचं माध्यम तर आहेच, पण यातून समाजाला योग्य तो संदेशही प्रभावीपणे देता येतो हे त्यांनी जाणले होते.
शांताराम बापू अतिशय कडक शिस्तीचे होते. कलाकार आणि तंत्रज्ञांवर त्यांचा वचक असे. भारतीय चित्रपटात पहिल्यांदा ऍनिमेशनचा वापर केला तोही शांताराम बापूंनी (जंबूकाका). ‘बॅक लिट’ प्रोजेक्शनचा वापर करणारे ते पहिले दिग्दर्शक (अमर ज्योती).
शांताराम बापूंनी तीन विवाह केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव विमल, दुसरी जयश्री आणि तिसरी संध्या. ‘शांताराम’ हे त्यांचं आत्मवृत्त मराठी आणि हिंदीमध्ये 1986 साली प्रकाशित झालं आहे. व्ही. शांताराम यांचे 30 ऑक्टोबर 1990 रोजी निधन झाले. व्ही. शांताराम यांना आदरांजली.
शब्दांकन : संजीव वेलणकर