टीम AM : सशक्त अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आज स्मृतीदिन. त्यांचा जन्म. 26 ऑक्टोबर 1954 ला झाला. लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपट सृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. वास्तविक अनेक गंभीर भूमिकांमधूनही त्यांनी आपली सशक्त अभिनय क्षमता दाखवून दिली. मात्र, एकूणच त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे त्यांच्यावरचा विनोदी अभिनेत्याचाच शिक्का कायम राहिला.
लक्ष्मीकांत बेर्डे यांना खरा ‘ब्रेक थ्रू’ मिळाला तो ‘टुरटुर’ या नाटकाने. हे पहिलेच नाटक जबरदस्त हीट ठरले. त्यानंतर शांतेचे कार्ट चालू आहे, बिघडले स्वर्गाचे द्वार, कार्टी चालू आहे ही नाटकेही यशस्वी ठरली. मग लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मागे वळून पाहिलेच नाही. नाटके करता करता त्यांनी चित्रपटात प्रवेश केला. तेथेही ते प्रचंड यशस्वी ठरले. ‘लक्ष्या’ या नावाने अबालवृद्धांमध्ये त्यांची लोकप्रियता पसरली. त्यांची जोडी जमली ती महेश कोठारे यांच्यासमवेत.
कोठारेंचा चित्रपट अन लक्ष्या नाही असे सहसा घडलेच नाही. कारण कोठारे व बेर्डे म्हणजे व्यावसायिक यशाची हमखास खात्री अशी ओळख निर्माण झाली होती. त्याचबरोबर या दोघांचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के हमी हे समीकरणही रूढ झाले होते. धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट ते आताच्या ‘झपाटलेला’ पर्यंत ते कायम होते.
सचिनबरोबरही ‘बनवाबनवी’ सह अनेक चित्रपट केले. त्यांना अभिनयाची नैसर्गिक देणगी मिळाली होती. विनोदाचे त्यांचे टायमिंग अचुक होते. प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन टाकण्याची त्यांची शैली अनोखी होती. त्यांच्या लोकप्रियतेला ‘कॅश’ करण्यासाठी ‘चल रे लक्ष्या’ मुंबईला सारखा चित्रपटही निघाला.
अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने याच काळात धुमाकूळ घातला. वास्तविक या दोन्ही कलाकारांचे ट्युनिंग अतिशय चांगले जमले होते. मात्र, त्याचा चांगला उपयोग फार कमी दिग्दर्शकांना करता आला. त्यांच्या चित्रपटांनी मराठी मनांचे मनोरंजन करीत अनेकांना आयूष्यातील तणाव, दुःख विसरायला लावून आनंदाचे कारंजे फूलविले.
मराठीत प्रसिध्दीच्या लाटेवर स्वार असतांनाच त्यांना हिंदीत चांगल्या निर्मिती संस्थांच्या ऑफर्स आल्या. राजश्री प्रॉडक्शनचा मैने प्यार कियाहा त्यातीलच एक. यात लक्ष्मीकांतने सलमान खानच्या मित्राची भूमिका अगदी छान निभावली. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. पण अभिनयाचा कस लागेल अशी भूमिका त्यांनी हिंदीत क्वचितच मिळाली.
मराठीत अशा भूमिका त्यांना मिळाल्या, पण त्याही अगदी थोड्याच. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘एक होता विदुषक’ या गंभीर नाटकातील भूमिकेने लक्ष्मीकांतच्या अभिनय क्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. अगदी अलीकडच्या काळात त्यांनी पुन्हा रंगभूमीवर लेले विरूद्ध लेले आणि सर आले धावून या नाटकाद्वारे बऱ्याच वर्षांनी पाऊल ठेवले. पण ही नाटके फार चालली नाहीत. अनेक दूरचित्रवाणी मालिकांमधूनही त्यांनी एक काळ गाजवला. असा हा हरहुन्नरी कलाकार चाहत्यांना शेवटपर्यंत हसवत राहिला. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे 16 डिसेंबर 2004 रोजी निधन झाले. लक्ष्मीकांत बेर्डे यांना आदरांजली.
शब्दांकन : संजीव वेलणकर