भोगवट्याच्या जाचक अटीमुळे रमाई आवास योजनेची अंमलबजावणी नाही
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, मागासवर्गीय विकासापासून ‘वंचित’:
टीम AM : अंबाजोगाई शहरातील भोगवटाधारक गेल्या कित्येक वर्षांपासून मालकीहक्काच्या पीटीआरसाठी झगडत असून नगर परिषद प्रशासन मात्र याकडे कागदी घोडे नाचवत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. याच भोगवट्याच्या जाचक अटीमुळे मागासवर्गीयांसाठी असलेली ‘रमाई आवास घरकुल योजना’ रखडली असल्याने याचा लाभ शहरातील बहुतांश मागासवर्गीय वस्त्यांतील लाभार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे रमाई आवास योजनेपासून अंबाजोगाई शहरातील मागासवर्गीयांना ‘वंचित’ रहावे लागत आहे.
दुसरीकडे बीड जिल्ह्यातीलच गेवराई येथील आमदार लक्ष्मण पवार यांनी गोरगरीब आणि मागासवर्गीय जनतेचा भोगवट्याचा प्रश्न गांभीर्याने घेत शासन दरबारी आवाज उठवत निकाली काढला असून नगर परिषदेमार्फत भोगवटाधारकांना मालकी हक्काच्या पीटीआरही मिळवून दिल्या आहेत, यामुळे गेवराई शहरातील भोगवटाधारकांना शासनाच्या विविध योजना मिळवण्यासाठी येणारी अडचण दूर झाली आहे, मात्र अंबाजोगाई शहरातील भोगवट्याचा प्रश्न अजूनही ‘जैसे थे’ असाच आहे.
अंबाजोगाई शहरात अनुसूचित जातीतील आणि नवबौद्ध रहात असलेल्या बहुतांश वसत्या या भोगवट्यात आहेत. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या पीटीआरवर भोगवटा असा उल्लेख करण्यात येतो. पीटीआरवर भोगवटा अशी नोंद असल्यामुळे रमाई आवास योजनेचा लाभ भोगवटाधारक असणाऱ्या लाभार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे अंबाजोगाई शहरात भोगवट्याच्या जाचक अटीमुळे रमाई आवास योजनेची अंमलबजावणी होत नाही आणि त्यामुळे ही योजना अंबाजोगाईत नुसती कागदावरच राहिली आहे. भोगवट्यामुळेच शहरातील बहुतांश वस्तीतील मागासवर्गीयांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचाही लाभ मिळत नाही.
आमदार लक्ष्मण पवार यांचा आदर्श लोकप्रतिनिधी घेतील का ?
गेवराई शहरातील भोगवट्यात राहणाऱ्या नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तेथील कर्तव्यदक्ष आमदार लक्ष्मण पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करत तेथील भोगवट्याचा प्रश्न निकाली काढत नगर परिषदेच्या वतीने भोगवटाधारकांना मालकी हक्काच्या पीटीआर देण्यात आलेल्या आहेत. आ. लक्ष्मण पवार यांचा आदर्श अंबाजोगातील आमदार, माजी आमदार, लोकप्रतिनिधी घेतील का ? असा प्रश्न मागासवर्गीय भोगवटाधारकांच्या वतीने विचारला जात आहे.
लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज
अंबाजोगाई शहरातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील नागरिकांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यासाठी भोगवट्याची अट जाचक ठरत आहे. ही जाचक अट शिथिल करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. ही जाचक अट शिथिल झाल्यानंतर अंबाजोगाई शहरातील बहुतांश नागरिकांना या योजनेचा लाभ मिळू शकेल आणि या योजनेची अंमलबजावणी ही होईल.