आशिकी… कुमार सानू : एकाच दिवसात 28 गाणी केली ध्वनीमुद्रित

टीम AM : ज्येष्ठ गायक कुमार सानू यांचा वाढदिवस. कुमार सानू यांचा जन्म. 20 ऑक्टोबर 1957 ला कोलकात्ता येथे झाला. कुमार शानू यांचे खरे नाव केदारनाथ भट्टाचार्य. कल्याणजी – आनंदजी यांनी किशोरकुमार मधील कुमार हे नाव उचलून त्यांना कुमार सानू हे नाव दिलं. नव्वदच्या दशकात कुमार सानू ऐन भरात होते. अर्थात, त्याचं स्ट्रगल सुरू झाला तो 1979 पासून. त्यांचे वडील पशुपतीनाथ भट्टाचार्य हे कोलकात्यातील गायक व संगीतकार. त्यांनी कुमार सानू यांना गाण्याचं प्राथमिक शिक्षण दिलं. 

सानू तबलाही शिकले. स्टेज शो करणाऱ्या सानूला हेरलं ते दिवंगत गझल गायक जगजित सिंग यांनी. त्यांनी आंधिया सिनेमामध्ये त्याला एक गाणं दिलं, शिवाय कल्याणजी – आनंदजी यांच्याशी परिचय करून दिला. 

कल्याणजी – आनंदजी यांनी त्यांना जादूगर या सिनेमासाठी गायची संधी दिली. ते गाणं होतं, मै जादूगर है मेरा नाम गोगा. या संगीतकार बंधूंनी त्यांना केवळ गाणंच दिलं नाही, तर त्यांचं बारसंही केलं. 1990 मध्ये आलेल्या आशिकीमुळे कुमार सानू यांचे नशीब फळफळलं. महेश भटच्या या सिनेमातली गाणी खूपच गाजली. कुमार सानू व टी – सिरीजचे गुलशन कुमार यांची 90 च्या दशकातील सहज लोकांच्या ओठावर रुळतील अशी कर्णमधुर गाणी ज्यात सिंहाचा वाटा कुमार सानू यांचा होता. 

आशिकी मधील गाणी प्रेमाच्या सर्व भाव व्यक्त करणारी सर्व गाणी लोकांनी डोक्यावर घेतली. नंतर कुमार सानू यांच्या नावावर नवेनवे विक्रम होत गेले. एकाच दिवसात 28 गाणी ध्वनीमुद्रित करणं असो किंवा 1991 ते 1995 असे ओळीने पाच फिल्मफेअर पुरस्कार (अब तेरे बिन, मेरा दिलभी कितना पागल है, सोचेंगे तुम्हे प्यार, ये काली काली आँखे आणि एक लडकी को देखा तो) जिंकणं असो, कुमार सानू यांचाच बोलबाला होता. 

आता मात्र कुमार सानू अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून लांब आहेत. त्यांनी 2015 साली ‘दम लगा के हइशा’ या चित्रपटात एक गाणे गायले होते. कुमार सानू यांची मुलगी शॅनन पॉप संगीतात बरीच लोकप्रिय असून, ‘अ लाँग टाइम’ हे तिचं गाणं बरंच गाजलं आहे. कुमार सानू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

शब्दांकन : संजीव वेलणकर