टीम AM : रंगाने काळ्या किंवा सावळ्या असणाऱ्या व्यक्तीकडे आपल्या देशात वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं. बॉलिवूडमध्येही रंग हीच गोष्ट महत्त्वाची समजली जाते. गोऱ्या रंगाच्या व्यक्तीला आपण अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून स्वीकारतो. पण रंगाने सावळ्या असणाऱ्या स्मिता पाटीलने या सर्व गोष्टींना छेद दिला, हे सर्व समज मोडून काढले. आपल्या अभिनयाच्या आणि आकर्षक व्यक्तीमत्वाच्या जोरावर स्मिताने भारतीय चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. तिच्या मृत्यूला जवळपास 38 वर्षे होऊन गेली तरी ती अनेकांच्या कायम लक्षात आहे. सौंदर्याची परिभाषा बदलणाऱ्या या स्मिता पाटीलचा आज स्मृतीदिन आहे.
स्मिता पाटील हिचा जन्म पुण्यात झाला. वडील शिवाजीराव पाटील हे राजकारणी आणि समाजवादी विचारांचे तर आई विद्याताई पाटील या समाजसुधारक. त्यामुळे घरातील वातावरण हे अत्यंत पुरोगामी होतं. त्याचा परिणाम स्मिताच्या आयुष्यावर झाला. स्मिता शाळेत असल्यापासून नाटकात भाग घ्यायची. तसेच ती एक ॲथलिटही होती. तिने राज्यस्तरीय स्पर्धेतही भाग घेतला. पण चित्रपटाशी तिचा वा तिच्या परिवाराशी काही संबंध नव्हता.
नंतरच्या काळात स्मिता आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईला शिफ्ट झाली. त्याचवेळी मराठी दूरदर्शनची सुरुवात झाली होती. स्मिता तिच्या मैत्रिणीसोबत दूरदर्शनमध्ये सहजच गेली होती. त्या ठिकाणी तिची टेस्ट घेण्यात आली आणि तिला दूरदर्शनमध्ये वृत्तनिवेदकाची संधीही मिळाली. त्यावेळी स्मिताचं वय अवघं 18 इतकं होतं.
शाम बेनेगल यांची ऑफर
दूरदर्शनमध्ये स्मिता ज्यावेळी बातम्या सांगायची त्यावेळी टीव्हीसमोर गर्दी व्हायची. स्मिताचा आकर्षक लूक पाहण्यासाठी लोकांची रस्त्यावर गर्दी व्हायची असं सांगितलं जातं. त्याचवेळी शाम बेनेगल कोणत्यातरी कामानिमित्ताने दूरदर्शनमध्ये आल्यानतंर त्यांनी स्मिताला पाहिलं आणि तिला चित्रपटाची ऑफर दिली. स्मिताचा चेहरा अत्यंत भावुक असल्याने ‘चरणदास चोर’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी ‘निशांत’ या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा संधी दिली.
आईच्या जीवनाचा प्रभाव
स्मिताने तिच्या फिल्मी करियरमध्ये अनेक समांतर चित्रपट केले. अनेक चित्रपटांमध्ये तिने कणखर स्त्रीची भूमिका साकारली. यामागे तिच्या आईचा प्रभाव असल्याचं सांगितलं जातंय. स्मिताच्या आई विद्याताई पाटील या समाजसुधारक होत्या आणि या गोष्टीचा स्मिताच्या आयुष्यावर इतका परिणाम झाला की ‘उंबरठा’ या मराठी चित्रपटात साकारलेली भूमिका ही स्मिताच्या आईचीच असल्याचं सांगितलं जातंय.
स्मिताने सुनिल दत्त यांनी निर्मित केलेल्या कँसरवर आधारित ‘दर्द का रिश्ता’ चित्रपटात केवळ एक रुपयाचं मानधन घेऊन काम केलं. तसेच अनेक चित्रपटांमध्ये समांतर भूमिका केल्या. या गोष्टी स्मिताच्या अंगभूत होत्या.
‘भूमिका’ चित्रपटासाठी स्मिताला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटातील स्मिताच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक करण्यात आलं. या चित्रपटानंतर स्मिता एक जबरदस्त अभिनेत्री असल्याचं स्पष्ट झालं. स्मिताने ज्या ज्या चित्रपटात काम केलं त्यामध्ये तिने अभिनेत्यांपेक्षा अधिक भाव खाल्ला.
व्यावसायिक चित्रपटातही केले काम
समांतर चित्रपटात काम करणाऱ्या स्मिताचं व्यक्तिमत्व हे कमर्शियल चित्रपट करण्यासारखं नाही अशी चर्चा असायची. हे आव्हानही स्मिताने स्वीकारलं आणि ‘शक्ती’ आणि ‘नमक हलाल’ अशा चित्रपटातही काम केलं. ‘नमक हलाल’ या चित्रपटातील ‘आज रपट जाये तो हमे ना उठय्यो’ हे तिच गाणं प्रचंड गाजलं.
कुटंब लग्नाच्या विरोधात
स्मिताच्या आयुष्यात सर्वात आव्हानात्मक काळ होता तो तिचा आणि राज बब्बरचे प्रेम प्रकरणाचा काळ. लग्न झालेल्या राज बब्बरच्या ती प्रेमात पडली होती. या प्रेमाला स्मिताच्या कुटुंबाचा विरोध होता. महिलांच्या समस्येवर स्मिता नेहमीच आवाज उठवायची. त्याच स्मिताने एका लग्न झालेल्या महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये असं विद्याताईंना वाटायचं. राज बब्बरने तिच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. त्यामुळे स्मिताच्या आणि राज बब्बरच्या लग्नाला तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता. पण स्मिता प्रचंड जिद्दी होती. तिने राज बब्बरलाच आपला जोडीदार निवडला होता.
आयुष्याच्या खडतर काळातून प्रवास
आयुष्यातील अत्यंत खडतर तणावाच्या काळातून, मानसिकतेतून जात असलेल्या स्मिताला मुलगा झाला. पण त्यानंतर तिला नेटल प्रॉब्लेमला सामोरं जावं लागलं. याचं निदान लवकर झालं असतं तर ती यातून बरी झाली असती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. समाजातील रूढी परंपरांना आपल्या रील आणि रिअल लाईफमध्ये आव्हान देणाऱ्या स्मिताला यातून बाहेर पडता आलं नाही आणि यातच तिचं निधन झालं. स्मिता नावाच्या या वादळानं 13 डिसेंबर 1986 रोजी जगाचा निरोप घेतला.
चित्रपट सृष्टीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल स्मिताला 1985 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मंथन, भूमिका, आक्रोश, चक्र, निशांत, वारीस, अर्थ, मिर्च मसाला, आज, नजराणा या चित्रपटातील भूमिकांनी तिने रसिकांच्या मनावर वेगळीच छाप उमटवली. तसेच सामना, जैत रे जैत, राजा शिव छत्रपती, उंबरठा या सारख्या मराठी चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची उंची दाखवली.
काही लोक असे असतात की, ते अत्यंत कमी काळात आपल्या कामाची छाप उमटवतात आणि या जगाचा निरोप घेतात. स्मितानेही वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पण आपल्या अभिनयाने ती नेहमीच रसिकाच्या लक्षात राहिल हे नक्की. स्मिता पाटील यांना विनम्र अभिवादन.