‘ड्रीम गर्ल’ हेमामालिनी : दिग्दर्शकांनी चित्रपटात घेण्यासाठी दिला होता नकार, वाचा…

टीम AM : ‘ड्रीम गर्ल’ हेमामालिनी यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म. 16 ऑक्टोबर 1948 ला झाला. हेमामालिनी यांचे पूर्ण नाव हेमामालिनी चक्रवर्ती. हेमामालिनी यांची आई जया चक्रवर्ती ह्या तमिळ चित्रपटाच्या निर्मात्या होत्या, त्यामुळे घरी आधीपासूनच चित्रनगरीशी जुळवून घेणारे वातावरण होते. आपल्या चार दशकाहूनही अधिक काळापासून सिनेसृष्टीत यशस्वी कलाकार म्हणून आणि कित्येक सुपरह हिट चित्रपट देणाऱ्या हेमामालिनी यांना सुद्धा सुरवातीच्या काळात निर्माते आणि निर्देशक यांनी म्हंटले होते की, त्यांच्यात स्टार अपील नाही. तमिळ दिग्दर्शक श्रीधर यांनी तिला चित्रपटात घेण्यासाठी नकार दिला होता. 

हेमामालिनी यांना पहिला ब्रेंक मिळाला तो राजकपूर सोबतच चित्रपट ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटात त्यांना ‘ड्रीम गर्ल’ म्हणून प्रचारित करण्यात आले होते, फिल्म बॉक्स ऑफिसवर फारशी यशस्वी ठरली नाही पण हेमा मालिनी यांचे कौतुक झाले आणि दर्शकांनी त्यांना पसंद केले होते. त्यानंतरच्या काही चित्रपटांनमध्ये सुद्धा त्यांना ‘ड्रीम गर्ल’ म्हणून समोर आणल्या गेले होते आणि आश्चर्य बघा की नंतर 1977 मध्ये त्यांना घेऊन प्रमोद चक्रवर्ती यांनी ‘ड्रीम गर्ल’ नावाचा सिनेमाच पडद्यावर आणला आणि तो गाजला सुद्धा होता. त्यांचा पहिला हिट सिनेमा होता ‘जॉनी मेरा नाम’, देव आनंद सोबतच्या त्या चित्रपटाने त्यांचे करियर उचलून धरले आणि लोकांनी त्या जोडीची खूप प्रशंसा केली होती. त्यानंतर आलेल्या रमेश सिप्पी यांच्या ‘अंदाज’ या चित्रपटातल्या अभिनयाने हेमामालिनी यांनी दर्शकांना मंत्रमुग्ध करून टाकले होते.

रमेश सिप्पी यांचाच चित्रपट ‘सीता और गीता’ मध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि ती फिल्म त्यांच्या करियर मध्ये निर्णायक ठरली होती. या चित्रपटानंतर त्या प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचल्या होत्या. या चित्रपटातील अतिशय सुंदर अभिनयामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा एकमेव ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला होता. सुरुवातीला ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटासाठी वैजयंतीमाला यांची निवड झाली होती पण त्यांनी वेळेवर त्यांच्या विवाहामुळे त्या चित्रपटात काम करायला आपली असमर्थता दाखवली आणि त्याऐवजी हेमामालिनी यांना संधी मिळाली होती. तसेच ज्या चित्रपटाने त्यांना प्रसिद्ध्यीच्या शिखरावर पोहचवले होते त्या ‘सीता और गीता’ मध्ये रमेश सिप्पी यांना मुमताज यांना घ्यायचे होते. पण काही कारणास्तव त्या या चित्रपटात काम करू शकल्या नाही आणि पर्यायाने तो चित्रपट हेमा मालिनी यांना मिळाला आणि मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले होते.

वैजयंतीमाला यांच्या निवृतीनंतर शास्त्रीय नृत्यांगना असलेली अभिनेत्रीची जागा हेमा मालिनी यांनी भरून काढली.1970 साली आलेल्या ‘शरारत’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा धर्मेंद्र सोबत काम केले होते आणि 1979 मध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्या सोबतच लग्न केले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत धर्मेंद्र सोबत एकूण 28 चित्रपटांमध्ये काम केले होते. 

सहसा विवाहानंतर अभिनेत्रीची कारकीर्द संपुष्टात येते, पण हेमामालिनी यांनी जिद्दीने आणि आपल्या परिश्रमाने विवाहानंतर सुद्धा बरेच यशस्वी चित्रपट दिलेत. जसे ‘क्रांती’, ‘नसीब’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘रजिया सुलतान’, एक नई पहेली’, ‘अंधा कानून’ आणि ‘अलिबाबा और चालीस चोर’ आणखी बरेच. उतरार्धात सुद्धा त्यांनी आपला चित्रपटाचा प्रवास सुरूच ठेवला. ‘बागबान’ या भूमिकेबद्दल त्यांना फिल्मफेअर पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. ‘वीरजारा’ मधील भूमिकेबद्दल पण त्यांची बरीच प्रशंसा झाली होती. त्यांनी आतापर्यंत सीता और गीता, शोले, संन्यासी, धर्मात्मा, प्रतिज्ञा, सत्ते पे सत्ता, बागबान यांसारखे 150 चित्रपट केले आहेत. 

‘ड्रीम गर्ल’ अशी हेमामालिनी यांची ओळख आहे. भरतनाट्यम मध्ये निपुण असलेल्या हेमामालिनी यांनी जगभर अनेक ठिकाणी आपल्या नृत्यांचे कार्यक्रम पण केले आहेत. सोबतच त्यांनी ‘दिल आशना है’ या शाहरुख खान आणि दिव्या भारती अभिनित चित्रपटाचे दिग्दर्शन पण केले होते. राजकारणात पण त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्या भारतीय जनता पार्टीच्या जनरल सेक्रेटरी होत्या आणि सध्या मथुरा येथील भाजपच्या खासदार आहेत. भरतनाट्यममध्ये विशारद असलेल्या हेमामालिनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

शब्दांकन : संजीव वेलणकर