टीम AM : प्रतिभासंपन्न, शिस्तीचा भोक्ता, रसिक मनाचा महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. अमिताभ यांचा जन्म. 11 ऑक्टोबर 1942 ला झाला. अमिताभ बच्चन यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत असत. चित्रपट सृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपुर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले.
प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सुमित्रानंदन पंत यांनी बच्चन कुटुंबातल्या या बाळाचं ‘अमिताभ’ या नावानं बारसं केले होते, अमिताभ बच्चन यांचे शिक्षण अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण नैनितालच्या शेरवूड महाविद्यालयात झाले आणि त्यानंतर दिल्लीच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानाची पदवी संपादन केली. त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला कोलकाता येथे एका कंपनीत काम केले. नंतर चित्रपटात संधी शोधण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले.
मुंबईत त्यांना ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्थानी’ या चित्रपटात सर्वप्रथम भूमिका मिळाली. त्यानंतर हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’ या चित्रपटात त्यावेळचे लोकप्रिय सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या समवेत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी ‘आनंद’ मधील भूमिकेचे सोने केले. त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाला. ‘नमक हराम’ या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी ठरली. त्या पाठोपाठ आलेला ‘जंजीर’ चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टरची त्यांची भूमिका विशेष गाजली आणि येथूनच त्यांची ‘अंग्री यंग मॅन’ ची प्रतिमा जनमानसात प्रस्थापित झाली.
प्रचलित समाज व्यवस्थेच्या विरोधात बंडखोरी व क्रोध व्यक्त करणाऱ्या संतप्त युवकाचे प्रतिनिधित्व त्यांनी पडद्यावर आपल्या भूमिकांद्वारे केले. त्यामुळे त्यांच्या भूमिका रसिकांना आपल्याशा वाटल्या. उंच शरीरयष्टी, भेदक डोळे, भारदस्त घनगंभीर आवाज आणि गहिरी भावगर्भ अभिनयशैली यामुळे बच्चन यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ते लवकरच ‘सुपरस्टार’ पदावर पोचले व रूपेरी पडद्यावर जणू अमिताभ युग सुरू झाले. आजतागायत त्यांच्याइतकी लोकप्रियता अन्य कोणत्याही अभिनेत्याला लाभलेली नाही.
अमिताभ बच्चन हे त्यांच्या काळात भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. अमिताभ बच्चन चित्रपटात असले म्हणजे चित्रपट आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरणार, असा चित्रपट उद्योगाचा वर्षानुवर्षांचा अनुभव होता. आतापर्यंत त्यांनी सुमारे 200 हून अधिक चित्रपटांतून भूमिका केल्या असून त्यांचे मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, यश चोप्रा यांसारख्या दिग्दर्शकांबरोबर केलेले चित्रपट विशेष गाजले. त्यांच्या यशस्वी, लोकप्रिय चित्रपटाच्या यादीत अभिमान, दीवार, शोले, कभी कभी, अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर, त्रिशूल, डॉन, काला पत्थर, नसीब, लावारीस, सिलसिला, नमक हलाल, कुली, शराबी, अग्निपथ यांसारख्या अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल. अमिताभ बच्चन यांनी 19 चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले आहे. मि. नटवरलाल या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.
धीरगंभीर, भारदस्त आवाज हे बच्चन यांचे आणखी एक वैशिष्ट्य. आपल्या भारदस्त आवाजाचा वापर त्यांनी भूमिका साकारताना तर केलाच, शिवाय काही चित्रपटांना त्यांनी आपल्या भारदस्त आवाजात पार्श्व-निवेदनही दिले आहे. त्यांत भुवनशोम, शतरंज के खिलाडी, लगान आदी चित्रपटांचा उल्लेख करता येईल.
ज्येष्ठ अभिनेत्री जया भादुरी यांच्याशी 1973 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांनी राजकारणात हात आजमावला आहे. 1984 मध्ये ते अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांचे मताधिक्यही विक्रमी ठरले. राजकारणातली त्यांची कारकीर्द मात्र त्यांना मानवली नाही.
1982 साली कुली या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी त्यांना अपघात झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यावेळी त्यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी देशभर प्रार्थना, नवस केले व शुभेच्छा दिल्या. त्यांनी 1996 मध्ये अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लि. ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली होती. आर्थिक नुकसानीमुळे त्यांना ती बंद करावी लागली. 2000 मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’ या दूरचित्रवाणीवरील प्रश्नमंजुषा मालिकेने त्यांच्या लोकप्रियतेत अधिकच भर घातली. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे, याचा आदर्श वस्तुपाठच बच्चन यांनी आपल्या निवेदनाने घालून दिला.
वाढत्या वयानुसार बच्चन यांनी आपल्या भूमिकांचा बाज बदलला असला, तरी त्यांचा अभिनय उत्तरोत्तर अधिकाधिक परिपक्व होत गेलेला दिसून येतो. अमिताभ बच्चन यांची कारकीर्द अद्यापही चालू असून वयाच्या 81 व्या वर्षात प्रवेश करताना ते तरुणांना लाजवेल अशा उत्साहात कार्यरत आहेत. गेली अनेक वर्षे ते ‘केबीसी’ साठी सूत्रसंचालन करत आहेत. आतापर्यंत त्यांना 14 वेळा फिल्मफेअर पुरस्कार तर तीन वेळा उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, 1984 मध्ये पद्मश्री, 2001 मध्ये पद्मभूषण आणि 2015 साली पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून भारत सरकारने या महानायकाचा गौरव केला आहे. या शिवाय अनेक मानद उपाध्याही त्यांना मिळाल्या आहेत. विदेशांतही त्यांचे सन्मान झाले आहेत.
प्रतिष्ठेचा समजला जाणारा गेल्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळाला आहे. गेल्या वर्षी ‘गुलाबो सिताबो’, ’झुंड’, ’ब्रह्मास्त्र’ आणि ‘चेहरे’ या चित्रपटात दिसले होते. अमिताभ बच्चन हे सध्या सोनी टीव्हीवरील शो ‘कौन बनेगा करोडपती’ ला होस्ट करत आहेत. अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
शब्दांकन : संजीव वेलणकर